रेल्वे फाटकाला लागून भुयारी मार्ग काढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:32+5:302021-09-09T04:34:32+5:30
राजुरा: शहरालगतच्या आसिफाबाद राज्य मार्गावर दक्षिण सेंट्रल रेल्वेचे फाटक बंद राहत असल्याने, जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
राजुरा: शहरालगतच्या आसिफाबाद राज्य मार्गावर दक्षिण सेंट्रल रेल्वेचे फाटक बंद राहत असल्याने, जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसातून अनेक वेळा फाटक बंदचा व्यत्यय येत असल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती असल्याने रेल्वे विभागाने फाटका लगत पर्यायी भुयारी मार्ग काढावा, यासाठी ब्लॉक पँथर ग्रुपने रेल्वेचे व्यवस्थापक गजानन माल्या यांना निवेदन दिले आहे. राजुरा तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने राज्यमार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही गर्दी पाहायला मिळते. याच मार्गावर असणाऱ्या १५० ते २०० गावांतील जनतेचा हाच एकमेव मार्ग असल्याने, त्यांचीही या रस्त्याने ये-जा सुरू असते. सोबतच या मार्गावर शिवाजी महाविद्यालय व आयटीआय असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते, पण या राज्यमार्गावर दक्षिण सेंट्रल रेल्वेचे फाटक असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे फाटक दिवसातून अनेक वेळा बंद राहत असल्याने रस्त्यावर लगत भुयारी मार्ग काढणे गरजेचे झाले आहे. रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन माल्या आले असता, ब्लॉक पँथर ग्रुपने निवेदन दिले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष विजय चन्ने, कार्तिक सोमलकर, पावन चिंताला, आकाश वाटेकर, निखिल बजाईत, शुभम सोयम, भूपेंड साठवणे, सतीश बनकर, मारोती माउलीकर, जितेंद्र सेपुरवार, अभिजीत बोरकुटे उपस्थित होते.