‘त्या’ कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:33 AM2021-02-05T07:33:03+5:302021-02-05T07:33:03+5:30
घोसरी : पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मागील अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना कामावर येऊ देणे बंद केल्याने ...
घोसरी : पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मागील अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना कामावर येऊ देणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे व पोंभुर्णा प्रशासन संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील दहा वर्षांपासून पोंभुर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ११ कामगार रोजंदारी कामगार म्हणून काम करीत आहेत. कोरोनाकाळात सदर कामगार प्रामाणिकपणे व चिकाटीने काम करीत होते. तरीही नवीन संचालक मंडळाने काही कामगार ठेवून सहा कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. काही संचालकांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून संचालक पदावर नियुक्ती करून घेतली आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. चौकशी करून त्यांना तत्काळ पदावरून दूर करून आम्हाला पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी निवेदनातून केली आहे.
येत्या सात दिवसांत कामावर रुजू करून न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा किशोर अर्जुनकार, संतुल बोलमवार, दूर्वास कन्नाके, सचिन पोतराजे, अविनाश पद्मगिरीवार, संतोष तेलसे यांनी दिला आहे.