गाव विकासासाठी बेरोजगार युवक उतरले निवडणुकीच्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:42+5:302021-01-04T04:23:42+5:30
अमोद गौरकर शंकरपूर : आंबोली एक छोटेसे गाव. या छोट्याशा गावात उच्च विद्याविभूषित विद्यार्थी परंतु सध्या बेरोजगार असलेले ...
अमोद गौरकर
शंकरपूर : आंबोली एक छोटेसे गाव. या छोट्याशा गावात उच्च विद्याविभूषित विद्यार्थी परंतु सध्या बेरोजगार असलेले युवक एकत्र आले. गावातीलच विकासासाठी मागील दोन वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू केले. गावातील समस्या वारंवार सरपंच व ग्रामपंचायत यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या या समस्यांकडे ग्रामपंचायतीने कानाडोळा केला. त्यामुळे या युवकांनी यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांची पॅनेल तयार करून थेट निवडणूक रिंगणात उतरले. या गावात दिग्गजांच्या समोर हे बेरोजगार युवक समोरासमोर आले आहेत.
शंकरपूरपासून जवळच असलेले आंबोली हे ते गाव. या गावात नऊ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. या गावातले युवक व युवती शिक्षणासाठी बाहेर गेले होते. बाहेरूनच शिक्षण घेऊन ते गावात आले. गावात या युवकांनी गाव सुधारण्यासाठी युवा मंचची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम केले. यासोबतच नाले व रस्ते स्वच्छ केले. गवतकाडी झुडपाने वेढलेली स्मशानभूमी स्वच्छ केली. याशिवाय लोकांना शासकीय प्रशासकीय कामात मदत लागत होती किंवा कोणतीही अडचण येत होती, त्या अडचणी सोडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य युवा मंचच्या विद्यार्थ्यांनी केले. सर्वात मोठे म्हणजे लॉकडाऊन काळात सर्व शाळा बंद होत्या. पण या युवकांनी गावातील मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षण देण्याचे काम केले. गावातील भिंती बोलक्या केल्या. गाव विकासासाठी ग्रामपंचायतीवर सत्ता असणे गरजेचे आहे, हे त्यांना समजून आले. त्यामुळे त्यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपणच उभे राहून गावाचा विकास घडवूया असा संकल्प केला आणि हे उच्च विद्याविभूषित विद्यार्थी युवा मंच परिवर्तन पॅनेल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उभे झाले आहेत.
यात कला शाखेचा पदवीधर असलेला केशव गजबे, बीएड झालेली प्रतिमा शिवरकर, कल्पना बगळे, अभियंता वैभव ठाकरे, कला शाखेची पदवीधर शालिनी दहोत्रे, वाणिज्य शाखेत पदवी असलेला शुभम मंडपे, कृषी शाखेत बीएससी असलेला स्वप्नील गजबे, सायन्स शाखेची पदवी असलेली प्रियंका नागोसे आणि कला शाखेत पदवीधर असलेली रज्जू सवाईकर या तरुण-तरुणींचा समावेश आहे. हे सर्व २७ वर्षांच्या आतील आहेत. त्यांच्याजवळ निवडणुकीसाठी लागणारा खर्च नसल्यामुळे त्यांनी गावात आवाहन करून नागरिकांकडेच मदतीची मागणी केली आहे. ही युवा पिढी गावात असलेल्या दिग्गजांना पराभूत करते की नाही हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दिसेल. परंतु हे युवक निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे दिग्गजांच्या भुवया मात्र उंचावलेल्या आहेत.