बाह्य यंत्रणेच्या पदभरतीमुळे तासिका कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 02:21 PM2024-10-18T14:21:24+5:302024-10-18T14:22:27+5:30

शासनाने गंभीर होणे गरजेचे : आयटीआयतील तासिका तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांत असंतोष

Unemployment on hourly workers due to outsourcing | बाह्य यंत्रणेच्या पदभरतीमुळे तासिका कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Unemployment on hourly workers due to outsourcing

लोकमत न्यूज नेटवर्क 
विसापूर :
नागपूर विभागातील आयटीआयमध्ये बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरविण्याचा फतवा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक नागपूर विभागाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढला आहे. शासन निर्णयाला बगल देण्याचा हा प्रकार आहे. यामुळे १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचा आसूड ओढला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 


ऐन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधूमीत आयटीआयमध्ये कार्यरत कर्मचान्यांत असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघाने आयटीआयमध्ये होणारी बाह्य यंत्रणेची पद भरती रद्द करण्याची मागणी पुढे केली आहे. 


महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने नागपूर विभागातील आयटीआयमध्ये मे अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी आणि लेबर सप्लायर्स या बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरविण्याचा करार केला आहे. या खासगी कंपनीला नागपूर विभागातील आयटीआयमध्ये तब्बल ४५५ कर्मचाऱ्यांना भरती करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये गट निदेशक, शिल्प निदेशक (व्यवसायनिहाय), गणित तथा चित्रकला निदेशक, वाहनचालक व सफाई कामगारांचा समावेश आहे. या बाह्य यंत्रणेच्या पद भरतीवर महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघाने आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने तासिका तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी अहवाल मागितला होता. प्रारंभी अल्प मानधनावर त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सेवा दिली. सेवारत असताना अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली. बाह्य यंत्रणा तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची शाश्वता नाही. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या बाह्य यंत्रणेचा कारभार तुघलकी स्वरूपाचा असल्याची माहिती आहे. 


राज्य शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याच्या आयटीआयमध्ये कार्यरत तासिका निदेशकांना कंत्राटी म्हणून समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने १४ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून समितीची स्थापना करण्याचे नमूद केले आहे. याची अंमलबजावणी न करता बाह्य यंत्रणा नेमणूक करून तासिका तत्त्वावर कार्यरत निदेशकांना देशोधडीला लावण्याचा प्रकार केला आहे. यामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता बळावली आहे. 


पदभरती तातडीने रद्द करा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये कार्यरत गट निदेशक, शिल्प निदेशक, गणित व चित्रकला निदेशक, वाहनचालक, सफाई कामगारांची कंत्राटी पदावर नियमित नियुक्ती करावी, आयटीआ- यमध्ये कंत्राटदारामार्फत पद भरती तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघाने केली आहे. यासंदर्भात मे. अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी आणि लेबर सप्लायर्स या बाह्य यंत्रणेच्या कंत्राटदारांशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.


"आम्ही मागील १५ वर्षांपासून आयटीआयमध्ये निदेशक म्हणून कार्यरत आहे. आम्ही आमची सेवा तासिका तत्त्वावर मानधनावर देत आहे. नागपूर विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून आयटीआयमध्ये पद भरती करण्याचा निर्णय अन्याय करणारा आहे. यामुळे आमची कुटुंबे उद्ध्वस्त होतील. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने अमरावती विभागाच्या धर्तीवर नागपूर विभागाने बाह्य यंत्रणेची आयटीआयमध्ये पद भरती रद्द करावी, ही शासनाकडे आग्रही मागणी आहे." 
- आशिष गजभिये, कार्याध्यक्ष, म. रा. आयटीआय निदेशक संघ, महाराष्ट्र.

Web Title: Unemployment on hourly workers due to outsourcing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.