एमआयडीसीअभावी बेरोजगारीत वाढ

By admin | Published: October 22, 2014 11:16 PM2014-10-22T23:16:57+5:302014-10-22T23:16:57+5:30

पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा

Unemployment rise due to MIDC | एमआयडीसीअभावी बेरोजगारीत वाढ

एमआयडीसीअभावी बेरोजगारीत वाढ

Next

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे युवक शेतीकडे न वळता इतर रोजगारांच्या शोधात आहेत. मात्र, या परिसरात एमआयडीसी किंवा अन्य उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
नव्याने राज्यात सत्तेत येणाऱ्या सरकारने तरी तालुक्यात उद्योग किंवा एमआयडीसी स्थापन करावे, अशी मागणी येथील नागरिकांसह महाविद्यालयीन युवकांनी केली आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजही पाहिजे तशा सोयीसुविधा तालुक्यात उपलब्ध नसल्याने नागरिकांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.
७१ गावांचा समावेश असलेल्या तालुक्यात आजघडीला एकही उद्योग नाही. वैनगंगा, अंधारी नदीच्या पाण्यावर सिंचनाची तसेच उद्योग उभारल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्याची लोकसंख्या ५० हजार ७८१ आहे. दवर्षी महाविद्यालयीन शिक्षण, आयटीआयमधून प्रमाणपत्र घेऊन शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात. पदवीधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे.
व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तालुक्यातील बेरोजगारांना पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी फार कमी प्रमाणात नोकरी मिळाली आहे. डी.एड., बी.एड. बीपीएड, एम.ए., एम.एड. शिक्षण घेतलेल्या पदव्युत्तरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा ते स्वयंनिर्भर व्हावे यासाठी शासनाने योजना सुरू केल्या आहेत.
परंतु येथे आजघडीला अनेक तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३० हजार ९८४ हेक्टर आहे. ३२ ग्रामपंचायती असून ७१ गावांचा समावेश आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा काळ लोटला. या आदिवासीबहुल मागास तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने परिसरातील बेरोजगारांना मिळेल ते काम करुन जगावे लागत आहे. तालुक्यामध्ये वैनगंगा व अंधारी या नद्यांचे स्त्रोत लाभले आहे. या नद्यांच्या पाण्यावर एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तालुक्यातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन बँकांच्या पतपुरवठ्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. लघु उद्योग मंडळाकडून लघु उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पोंभुर्णा तालुका मागासलेला आहे. केवळ धानशेतीवर अनेक शेतकरी अवलंबून आहे. मात्र, निसर्ग साथ देत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे. शासनाने या तालुक्याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Unemployment rise due to MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.