शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास संघ कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 12:55 AM2016-11-14T00:55:13+5:302016-11-14T00:55:13+5:30
संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही. संघटनेत माणसांची ये-जा सुरू असते. काहीचे काम संघाला बळकटी देणारे असते.
सुनील उईके : बल्लारपुरात शिक्षकांचे त्रैवार्षिक अधिवेशन
बल्लारपूर : संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही. संघटनेत माणसांची ये-जा सुरू असते. काहीचे काम संघाला बळकटी देणारे असते. यात काम करताना प्रामाणिकता जोपासावी लागते. याच पातळीवर शिक्षकांच्या सेवेसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक जिल्हा व तालुका शाखा कार्य करीत आहे. शिक्षकावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही प्रमाणात समस्या सोडविण्यात यश आले असून शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संघ कटीबद्ध असल्याचे मत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुनील उईके यांनी रविवारी येथे केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा बल्लारपूर तालुक्याच्या वतीने बामणी (दुधोली) येथील बालाजी हायस्कुलच्या प्रांगणात तालुकास्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. हरिश गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत धर्मपुरीवार, सरचिटणीस मुकुंदा जोगी, कोषाध्यक्ष विजय बोरकर, माजी सरचिटणीस सतीश बावणे, उपाध्यक्ष संजय डाहुले, शांताराम कुमरे, लिलाधर तिवाडे, रविकांत आसेकर, चंद्रकांत पांडे, कैलाश म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अॅड.हरिश गेडाम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र दिला. सामाजिक अन्याय निवारण्यासाठी हा प्रेरणादायी ठरला. याच अनुषंगाने शिक्षकांनी संघटित प्रयत्नातून समस्या सोडविण्यास सहकार्य करावे, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले. बल्लारपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील कोवे यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील उईके यांनी आगामी तीन वर्षासाठी बल्लारपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारिणी अधिवेशनात जाहीर केली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा तालुका बल्लारपूरच्या अध्यक्षपदी निलेश चिमड्यालवार, उपाध्यक्ष पुष्पलता गाडगे, सरचिटणीस सुरेश नगराळे, कार्यालय सचिव पंढरीनाथ कन्नाके, कोषाध्यक्ष धम्मदीप दखने, कार्याध्यक्ष विजय कार्लेकर, तालुका महिला संपर्क प्रमुख शालिनी कोवे, प्रसिद्धी प्रमुख सोनाली पिंपळकर, संयोजक शैला भोगेकर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
संचालन सरोज चांदेकर यांनी तर आभार सुरेश नगराळे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)