तणाव कमी करण्यासाठी पोलिसांकडून जोपासला जातो अनोखा छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:21+5:302021-05-10T04:28:21+5:30
चंद्रपूर : गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलही कोरोनो योद्धांच्या रूपात सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना ...
चंद्रपूर : गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलही कोरोनो योद्धांच्या रूपात सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना पोलीस विभागावर मोठा तणाव आहे. मात्र स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी विविध छंद जोपासून तणावविरहित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे वेळोवेळी लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यामुळे पोलीस रस्त्यावर उतरल्याशिवाय गर्दी नियंत्रणात आणणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे. सततच्या व्यस्ततेवर उपाय म्हणून आरोग्यासह शांतचित्त राहण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनेक छंद जोपासत स्वत:मधील सुप्तगुण जोपासत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात असे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. ते नोकरीवर लागण्यापूर्वीपासूनच आपला छंद जोपासत आहेत. या छंदातून मन:शांती व एक वेगळी ऊर्जा मिळत असल्याने त्यांचा अनुभव त्यांनी ‘लोकमत’जवळ कथन केला.
अवांतर वाचनाचा छंद
शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची सवय जडली. आतातर तो छंद झाला आहे. दररोज वाचन केल्याशिवाय चैनच मिळत नाही. यासोबत सकाळी एक तास नियमित व्यायामुसद्धा करीत असतो. त्यामुळे आलेला तणाव दूर होण्यास मदत होत असते. मन शांत ठेवण्यासाठी पुस्तकाला मित्र बनविणे गरजेचे आहे. त्यातूनच योग्य दिशा मिळत असते. आपला बौद्धिक विकास होत असतो.
-प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक
वाचनाला प्राधान्य
तणाव जाणवल्यास वाचनाला सुरुवात करायची. आपोआपच तणाव नाहीसा होतो. पूर्वीपासूनच वाचनाची आवड होती. ती आता आणखीच वृद्धिंगत झाली आहे. कोरोनाकाळातही वाचन सुरूच आहे. विविध विषयांचे वाचन केल्याने माहिती मिळते तसेच मानसिक समाधान लाभत असते. त्यामुळे दररोज एक तास तरी वाचन करीत असतो.
-शेखर देशमुख, पोलीस उपअधीक्षक (गृह)
आनापान साधना
तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी आनापान साधना करीत असतो. त्यातून मन शांत होत असते आणि प्रसन्न वाटत असते. दहा दिवसाचे आनापान साधना शिबिर केले आहे. तेव्हापासून नियमित आनापान करीत असतो. त्यातून मन एकाग्र होत असते. कधी काही तणाव वाटल्यास तिथेच श्वासाची प्रक्रिया बघत असतो.
किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
सायकलिंग व रनिंग
दररोज सकाळी सायकलिंग करणे आणि रनिंग करणे हा माझा नित्यक्रम आहे. त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटत असते. तणाव जाणवत नाही तसेच शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळत असते. पूर्वीपासून व्यायाम व सायकलिंगची सवय होती. आता तो छंदच झाला आहे. यामध्ये कधीच खंड पडू देत नाही.
हृदयनाथ यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर