जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 12:33 AM2017-01-17T00:33:33+5:302017-01-17T00:33:33+5:30
आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहातेच यासोबतच आपण सकारात्मक विचार करायलाही शिकतो,
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : भद्रावतीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
भद्रावती : आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहातेच यासोबतच आपण सकारात्मक विचार करायलाही शिकतो, कोण जिंकतो कोण हरतो हे महत्त्वाचे नसून स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. लागणारी जिद्द, आत्मविश्वास हा राष्ट्रासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
भद्रावती प्रिमिअर लीगद्वारे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शाहीद अली ले-आऊट पटांगण संताजी नगर भद्रावती येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी खेळाडू बाबुराव यादव, १९ वर्षाखाली माजी भारतीय क्रिकेट खेळाडू चंद्रशेखर आत्राम, चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, विजय वानखेडे, अफजलभाई, इम्रानखान, मनोज आष्टनकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली संजीवनी कावळे व राज्य संघात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंचा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत एकूण ४० संघानी सहभागी घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारीला होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन समिर उपलंचीवार, प्रास्ताविक अफजलभाई तर आभार इम्रान खान यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)