दोन महिन्यांनंतर अनलॉक; मात्र निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:00 AM2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:18+5:30

कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन कण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व बंद होते. परिणामी बाजारपेठ पूर्णत: ओस पडली होती.  दरम्यान, काही व्यावसायिकांनी  दुकान सुरु करण्याचा प्रयत्न केला त्यांना दंड भरावा लागला होता.

Unlocked after two months; Only restrictions remain | दोन महिन्यांनंतर अनलॉक; मात्र निर्बंध कायम

दोन महिन्यांनंतर अनलॉक; मात्र निर्बंध कायम

Next
ठळक मुद्देतिसऱ्या लाटेची भीती : सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाचस्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-१ मध्ये आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यापाऱ्यांसोबत एक बैठक घेत चर्चा केली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतर सोमवारपासून बाजारपेठ  नियमित वेळेत सुरू होत आहे. 
कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन कण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व बंद होते. परिणामी बाजारपेठ पूर्णत: ओस पडली होती.  दरम्यान, काही व्यावसायिकांनी  दुकान सुरु करण्याचा प्रयत्न केला त्यांना दंड भरावा लागला होता.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना, दुकाने बंद ठेवण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८, तसेच साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश  जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात म्हटले आहे. 

कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक
कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी नियमितपणे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना, दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता, प्रवेश करणाऱ्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा हँड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. 

५० टक्के क्षमतेने या बाबी राहतील सुरू

मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे, रेस्टॉरंट, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम, लग्न समारंभ (सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेने तथापि कमाल १०० व्यक्तींच्या मर्यादेत), व्यायामशाळा, सलून, केस कर्तनालय, ब्यूटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर. याशिवाय अंत्यविधीसाठी २० व्यक्ती उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. 
 

या गोष्टी राहतील सुरू
अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना, सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग, सर्व प्रकारची खासगी कार्यालये, क्रीडा, खेळ, चित्रीकरण, सभा, निवडणूक, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांची आमसभा, बांधकाम शेतीविषयक कामकाज नियमितपणे सुरू राहतील. तसेच ई-कॉमर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बस वाहतूक, माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती), आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (खासगी कार, टॅक्सी, बस व ट्रेन) नियमितपणे सुरू राहील.  प्रवासी जर स्तर-५ मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक राहील. याशिवाय उत्पादन निर्यात प्रदान उद्योग नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन क्षेत्र, जीवनावश्यक वस्तूची उत्पादन करणारे युनिट (जीवनावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा), निरंतर प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रदाता, माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा ‌व उद्योग, उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे.

सर्वांच्या सहमतीने झाला निर्णय
चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर १ मध्ये करण्यात आला असून, शासनाच्या आदेशानुसार जवळपास सर्व व्यवहार काही अटी व निर्बंधासह ७ जूनपासून सुरू होत आहे. असे असले तरी  कोरोनाचा धोका कमी झाला नसल्यामुळे, तसेच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढीस प्रतिबंध करणे व या रोगाची मानवी साखळी खंडित     करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, सर्व नगराध्यक्ष, व्यापारी संघटना यांची प्रशासनासोबत    चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकानांच्या वेळा सकाळी        सात ते सायंकाळी पाचपर्यंतच ठेवल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Unlocked after two months; Only restrictions remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.