लोकशाहीविरोधी संघटित क्लृप्त्या उधळून लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:44 AM2019-01-25T00:44:08+5:302019-01-25T00:44:32+5:30
मागील चार वर्षांपासून भारतात राजसत्तेवर आलेल्या सरकारने देशभक्तीच्या नावावर प्रशासन व समाजाला वेठीस धरणे सुरू केले. यातून धर्मांध शक्ती फोपावल्या. लोकशाही व राज्यघटनेतील मूल्यांविरूद्ध संघटीत क्लृप्त्या झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून भारतात राजसत्तेवर आलेल्या सरकारने देशभक्तीच्या नावावर प्रशासन व समाजाला वेठीस धरणे सुरू केले. यातून धर्मांध शक्ती फोपावल्या. लोकशाही व राज्यघटनेतील मूल्यांविरूद्ध संघटीत क्लृप्त्या झाल्या. त्यामुळे हा डावा जनतेने उधळून लावावा, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांनी केले. सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या वतीने मंगळवारी प्रियदर्शिनी सभागृहात घेण्यात आलेल्या ‘धर्मांधतांचा संघटीत दहशतवाद, लोकशाही व राज्यघटनेसमोरचे आव्हान’या विषयावर ते बोलत होते.
विधानसभेचे माजी उपसभापती अॅड. मोरेश्वर टेंभूर्डे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी भास्कर मुन तर मंचावर सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे व डॉ. रजनी हजारे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे, राजु झोडे, प्रा. विजय बदखल, प्रा. देवेंद्र वानखेडे, जगजितसिंह, प्रा. नामदेव कन्नाके, प्राचार्य सूर्यकांत खनके, अनिल अली, अॅड. फरहाद बेग, हिराचंद बोरकुटे, माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, खुशाल तेलंग, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश मालेकर, बलराजसिंग वधावण, डॉ. मनोहर लेनगुरे, पांडुरंग गावतुरे, दिनेश एकवणकर, जगन पचारे, माणिक सावरकर, पुंडलीक नंदुरकर, सेवकचंद नागदेवते उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, देशातील आयबीसारख्या शिर्षसंस्था धर्मांध शक्तींच्या ताब्यात आहेत. त्यामुळे गुन्हेगारीच्या तपासात हस्तक्षेप करतात. धर्मांध शक्तींच्या सुत्रधारांना वाचवतात. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख म्हणून नियुक्त झाल्यावर मालेगाव बॉम्बस्फोटात तपास करताना त्यांच्यासमोर अडथळे निर्माण करण्यात आले, असेही ते म्हणाले. अॅड. टेंभूर्डे म्हणाले, भारतीय लोकशाही सध्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या हाती गेली आहे. राज्यकर्ते लोकाभिमुख राज्यकारभार करण्याऐवजी लोकांना भिती दाखवत असल्याचे सांगितले. बळीराज धोटे यांनी सरकार लोकशाही धर्मनिरपेक्ष तत्वाला हरताळ फासत असल्याची टीका केली. मून यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालन प्रा. गुरनुले, प्रास्ताविक राजकुमार जवादे यांनी केले. रविंद्र चिलबुले यांनी आभार मानले.
प्रशासनातही धर्मांध शक्तींचा हस्तक्षेप
विशिष्ट जाती-धर्माच्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी तपास यंत्रणेत धर्मांध शक्तींचा हस्तक्षेप वाढत आहे. परिणामी, लोकशाही मूल्ये धोक्यात आली. धर्मांध देशद्रोहींचे बिंग फुटेल, या भितीमुळेच हा प्रकार घडत असल्याने लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र यावे, असेही निवृत्त पोलीस महानिरीक्षक मुश्रीफ यांनी व्याख्यानात नमुद केले.