असंघटित महिलांची कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:15 PM2019-01-08T23:15:31+5:302019-01-08T23:16:52+5:30
केंद्र व राज्य सरकारने असंघटीत महिलांच्या हितासाठी विकास योजना सुरू न केल्याच्या निषेधार्थ शेकडो असंघटित महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारने असंघटीत महिलांच्या हितासाठी विकास योजना सुरू न केल्याच्या निषेधार्थ शेकडो असंघटित महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला.
असंघटित महिलांना किमान वेतन द्यावे, महागाईनुसार भत्ता देण्याची कायद्यात तरतूद करावी, भविष्यनिर्वाह निधी, बोनस देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावी, अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि कृषी क्षेत्रातील असंघटीत कामगारांच्या हितासाठी नवीन धोरण तयार करावे, मोलकरीण मंडळासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आर्थिक तरतूद करावी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील रिक्त पदे भरावी, आदींसह विविध मागण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचल्यानंतर सभा झाली. यावेळीे आयटकचे राज्यसचिव विनोद झोडगे, सीटूचे राज्य उपाध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे, वामन बुटले, संतोष दास, भारतीय कम्युनिष्ट पार्टीचे प्रा. नामदेव कन्नाके, इलेक्ट्रिसिटी वर्कर्सचे प्रकाश वानखेडे, संजय नागापुरे, कृणाल बाबूलकर, प्रशांत ठाकरे, एन. टी. म्हस्के, राकेश पवार, राजु गैनवार, प्रकाश रेड्डी, वनिता भिमटे, वनिता कुंटावर, शोभा बोगावार, कल्पना रायपुरे, कुंदा कोहपरे, नामदेव नखाते, शारदा येलमुले आदींसह डाव्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोळसा उत्पादनावर परिणाम
केंद्र सरकारविरूद्ध वेकोलि कामगार संघटनांनी आजपासून देशव्यापी संप पुकारला. या संपामुळे बल्लारपूर क्षेत्राच्या सात कोळसा खाणींतील उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. कामगारांनी वेकोलि मुख्य प्रवेशद्वारावर सभा घेतली. सभेदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. हा संप बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. संपामध्ये भारतीय राष्ट्रीय खदान मजदूर फेडरेशन (इंटक), संयुक्त खदान मजदूर संघ (आयटक), हिंद खदान मजदूर फेडरेशन (एचएमएस), लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन (सीटू) आदी चार संघटना सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती कामगार नेते दिलीप कनकूलवार, अशोक चिवंडे, ईश्वर गिरी, विजय कानकाटे, आर. आर. यादव, रवी डाहूले, रायलिंगू झुपाका, संग्रामसिंह, गणपत कुडे, दिनेश जावरे, गणेश नाथे, सुधाकर घुबडे, शेख सलिम,मधुकर ठाकरे आदींनी दिली.
कामगार कायद्यात हस्तक्षेप नको
भारतीय संविधानाच्या आधारावर कामगार कायदा तयार करण्यात आला. परंतु असंघटीत कामगारांचे हित लक्ष न घेता सरकारकडून बदल केल्या जात आहेत. यामुळे महिला कामगारांचे हाल होणार आहेत. या कायद्यामध्ये हस्तक्षेप करू नका, अशी मागणी असंघटीत महिलांनी यावेळी केली.
संपामुळे आर्थिक कोंडी
राष्ट्रीयकृत बँकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका दिवसभर बंद होत्या. याामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार खोळंबले. सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक कोंडी झाल्याचे दिसून आले.
शासकीय कर्मचाऱ्यांची निदर्शने
चंद्रपूर: सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणामुळे कर्मचाऱ्यांची सेवा नियमाधिनता तसेच किमान जीवन वेतन मिळण्यासंदर्भात समस्या निर्माण झाल्याचा आरोप करत राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आज जिल्हा कचेरीसमोर निदर्शने देण्यात आले. कायमस्वरुपी सेवाविषयक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ११ कर्मचारी संघटना, केंद्र व राज्य सरकारमधील संघटनांनी संयुक्तपणे देशव्यापी संप पुकारला या संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेने पाठींबा दिला. मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करुन सरकारविरोधी तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.