सहकारी कामगारांनी वाहिली अनोखी श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2016 12:53 AM2016-06-04T00:53:41+5:302016-06-04T00:53:41+5:30
ताडाळी एमआयडीसी परिसरातील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर कंपनीमध्ये काम करीत असलेल्या एका कामगाराचा राहत्या घरी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाला.
मानवतेचे दर्शन : मृत कामगाराच्या कुटुंबाला ३१ हजारांची मदत
घोडपेठ : ताडाळी एमआयडीसी परिसरातील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर कंपनीमध्ये काम करीत असलेल्या एका कामगाराचा राहत्या घरी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या अकाली व अनपेक्षित निधनामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. ही बाब लक्षात घेऊन गोपानी कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मदत उभारून ३१ हजारांचा निधी जमविला. आपल्या सहृदयतेचा परिचय देणाऱ्या या कामगारांनी रविवारी हा निधी मृत कामगाराच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला.
महाकुर्ला येथील रहिवासी नागोराव भोयर हे मागील काही वर्षांपासून ताडाळी येथील गोपानी कंपनीमध्ये कार्यरत होते. १४ मेच्या सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घरी असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. कुटुंबीयांनी खाजगी गाडीची व्यवस्था केली. मात्र दवाखान्याच्या वाटेवरच तिव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. एका क्षणात सारे काही संपले होते. भोयर कुटूंबियांना आधार देणारा आधारवडच नियतीने हिरावून नेला होता. नागोराव भोयर यांच्या अवेळी जाण्याचे वृत्त समजताच कंपनीतील कामगार व अधिकारी यांनाही धक्काच बसला.
मात्र, भोयर कुटुंबासाठी काही आर्थिक मदत करता येईल का, असा विचार कंपनीतील काही कामगार बांधवांनी बोलून दाखविला आणी कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी व कामगार बांधवांनी ही कल्पना आकाराला आणली. सर्वांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातून ३१ हजार ५७० रुपयांचा निधी उभारला गेला.
रविवारी नागोराव भोयर यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाप्रसंगी ही आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. नागोराव भोयर हे कंपनीमध्ये त्यांच्या लाघवी स्वभावाने सर्वांना परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. भोयर यांच्या जाण्याने चांगला सहकारी हरविल्याची प्रतिक्रीया कामगारांतून उमटत आहे.(वार्ताहर)