तब्बल ५० वर्षांनंतर प्रकाशित होणार चंद्रपूर जिल्ह्याचे अपडेट गॅझेटियर!
By राजेश मडावी | Published: April 13, 2023 01:45 PM2023-04-13T13:45:39+5:302023-04-13T13:46:40+5:30
१९०९ मध्ये पहिली आवृत्ती : १९७३च्या आवृत्तीनंतर आता पहिल्यांदाच दोन खंडांची तयारी
राजेश मडावी
चंद्रपूर : राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाद्वारे प्रकाशित गॅझेटियर (दर्शनिका)ची माहिती अधिकृत मानली जाते. गॅझेटियर प्रकाशनाची ही मौलिक परंपरा ब्रिटिशांनी सुरू केली. मात्र, १९७३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटियर प्रकाशित झाल्यानंतर, आतापर्यंतच्या बदलांची अपडेट माहिती समाविष्ट नव्हती. तब्बल ५० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटियर दोन खंडांत प्रकाशित होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध क्षेत्रांतील सर्वंकष बदलांचा त्यात समावेश होईल काय, याकडे आता अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षानिमित्त राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी शासनाने विविध समित्या गठित केल्या. मात्र, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कोअर समिती काय निर्णय घेते, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. ५ डिसेंबर, २०२२ रोजी झालेल्या कोअर समितीच्या बैठकीत गॅझेटियर व पुरवणी गॅझेटियर नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता, परंतु राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचे गॅझेटियर प्रकाशित होणार, याबाबत संभ्रम कायम होता. दरम्यान, दर्शनिका विभागाने यासाठी २ कोटी ८४ लाख ९० हजार १०७ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. या प्रस्तावाला शासनाने मान्यता देऊन निधी मंजूर केला. चंद्रपूर जिल्ह्याच्या गॅझेटियरचे एक व दोन खंड प्रकाशित करण्याचा अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाचा समावेश कृती कार्यक्रमात करण्यात आला आहे.
गॅझेटियर म्हणजे तत्कालीन समाजाचा आरसा
ब्रिटिश राजवटीत १९०९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे इंग्रजी गॅझेटियर पहिल्यांदा प्रकाशित झाले. राज्यव्यवस्था चालविताना सर्व बारीकबारीक नोंदी ठेवण्याची दक्षता ब्रिटिशांनी घेतली. काही उणिवा असल्या, तरी खरा इतिहास दडपण्याची मनोवृत्ती असलेल्या तत्कालीन प्रस्थापित ज्ञान परंपरेला या इंग्रजी गॅझेटियरने छेद दिला. त्यामुळे हे गॅझेटियर म्हणजे तत्कालीन समाजाचा आरसा आहे.
मराठी अनुवादाची किंमत १२ आणे
१९०९ मध्ये प्रकाशित गॅझेटियरमधील बरीच माहिती १९०९च्या इंग्रजी व मराठी आवृत्ती गाळण्यात आली, शिवाय काही नवीन माहितीचा समावेश करण्यात आला. इंग्रजी आवृत्तीमधील माहिती अत्यंत मौलिक आहे. तत्कालीन रायपूरचे अतिरिक्त सहायक आयुक्त सीताराम श्रीधर पारखी यांनी १९०९ मध्ये इंग्रजी गॅझेटचा ‘चांदा चंद्रिका’ नावाने मराठी अनुवाद केला. पुण्याच्या जगद्वेतेच्छू प्रेसमधून हे गॅझेट प्रकाशित झाले. या गॅझेटची किंमत १२ आणे आहे. १९७३ नंतर ही आवृत्ती दुर्मीळ झाली.