सात तालुक्यात अद्ययावत विक्री केंद्र उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:38+5:30
चांदा क्लब मैदानावर शुक्रवारपासून पाच दिवस जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पाच दिवस महिला स्वयंसहाय्यता समूहमार्फत उत्पादित वस्तूंचे व कलाकृतीचे प्रदर्शन व विक्री चांदा क्लब वर होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांना आपल्या वस्तूंची, कलाकृतींची प्रदर्शन व विक्री करिता यावी, यासाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सात ठिकाणी पहिल्या टप्प्यात विक्री व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येतील. या मालाचा सर्वांना लाभ मिळावा. तसेच मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी, यासाठी जिल्ह्यांमध्ये पाच वाहने उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
चांदा क्लब मैदानावर शुक्रवारपासून पाच दिवस जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पाच दिवस महिला स्वयंसहाय्यता समूहमार्फत उत्पादित वस्तूंचे व कलाकृतीचे प्रदर्शन व विक्री चांदा क्लब वर होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले तर व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश काळे, सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार,जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, प्रकाश देवतळे, राकेश रत्नावार, घनश्याम मुलचंदानी, भास्कर माकोडे, रमाकांत देवराव भांडेकर, जिल्हा शिखर बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महिलांच्या हातात कला आहे. मात्र त्यांना उत्तम बाजारपेठ सुलभ विक्री व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. पुरुषांच्या हातचा पैसा संपला तरी महिलांच्या गाठीचे पैसे कधी संपत नाही, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी आपल्या भाषणामध्ये महिला बचत गटांना जिल्हा परिषद जागा उपलब्ध करून देईल. मात्र या ठिकाणी विक्री केंद्र उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या या प्रस्तावाला तत्काळ मान्यता देत आपण जागा उपलब्ध करून द्यावी व संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील १५ तालुक्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये सात ठिकाणी विक्री केंद्र तयार केले जातील. उर्वरित नंतरच्या टप्प्यांमध्ये केले जाईल, असे ना. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. याशिवाय जिल्ह्यामध्ये महिला बचत गट व स्वयंसहायता गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या कला कुसर, वस्तूंचे व अन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी पाच फिरती वाहने उपलब्ध करून देण्याचेही ना. वडेट्टीवार यांनी यावेळी घोषित केले.
जिल्ह्यात स्वयंसहायता गटाचे जाळे-संध्या गुरनुले
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी ग्रामीण भागात जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात स्वयंसहाय्यता गटाचे जाळे निर्माण झाले असल्याचे स्पष्ट केले. पोंभुर्णासारख्या तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात स्वयंरोजगार महिला स्वयंसहाय्यता गटांनी आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात अडीच हजार आदिवासी महिलांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली असून त्या मार्फत अर्थार्जन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या अनेक मोक्याच्या जागा शहरात उपलब्ध आहे. या ठिकाणी महिलांना विक्री केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. या प्रस्तावाला नंतर संबोधित करताना पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.