चंद्रपूर बाजार समितीची आवक निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:35 PM2017-12-01T23:35:33+5:302017-12-01T23:38:07+5:30
यावर्षीचा अत्यल्प पाऊस व विविध रोगांचा प्रार्दुभावाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
मंगेश भांडेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : यावर्षीचा अत्यल्प पाऊस व विविध रोगांचा प्रार्दुभावाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विविध पिकांच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट झाल्याने बाजार समित्यांची आवकही निम्म्यावर आली आहे.
शासनाने सोयाबीन खरेदीसाठी आधारभूत किमंत जाहीर करून शासकीय खरेदी सुरू केली होती. मात्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ ६१.७० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
यावर्षी खरिप हंगामाच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे उशिरा पिकांची लागवड झाली. त्यानंतर जेमतेम पाऊस झाला. सोयाबीन, कापूस, धान पीक जोमात होते. मात्र पीक हाती येण्याच्या स्थितीत असताना सोयाबीन, कापूस, धान पिकांवर विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने पिके नष्ट झाली.
धानावरील मावा-तुडतुडा, करपा अशा रोगांमुळे उभ्या पिकाची तणस झाली. तर कापूस पीकही अंतिम टप्प्यात असताना बोंड अळीने घात केला. त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. सध्या सर्व पिके निघाली असून कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने झाडावरच कापूस फुटत आहे. ज्यांचे कापूस आणि सोयाबीन निघाले ते मोजकेच शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीची आवक निम्म्यावर दिसून येत आहे.
खासगी खरेदीही निम्म्यावर
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पद्धतीने मालाची विक्री होते. यात कापूस पिकाला ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रूपये भाव दिला जात आहे. मात्र आतापर्यंत केवळ २४ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर सोयाबीनला २ हजार ३०० ते २ हजार ८६० रूपये भाव दिला जात असून केवळ १२ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे.
तारण योजनेत १३०० क्विंटल शेतमाल
शेतमालाची विपणन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन पिकासाठी तारण योजना सुरू केली आहे. यात ७९ शेतकऱ्यांनी जवळपास १३०० क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. तीन ते चार महिन्यानंतर या मालाचा लिलाव होणार आहे.
यावर्षी उत्पादन कमी असल्याने बाजार समितीची आवक फार कमी आहे. हमी भावाने सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीलाही शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.
- संजय पावळे
सचिव, बाजार समिती चंद्रपूर.