वडिलांच्या मदतीसाठी चिमुकल्यांची याचना
By Admin | Published: December 1, 2015 05:26 AM2015-12-01T05:26:48+5:302015-12-01T05:26:48+5:30
रात्रीचे ८ वाजले होते. सर्वत्र काळाकुट्ट अंधार होता. अशातच एका दुचाकी वाहनाचा अपघात होतो आणि दुचाकीचालक
मोहाळीजवळील घटना : जखमी वडील गाडीखाली दबून होते
घनश्याम नवघडे ल्ल नागभीड
रात्रीचे ८ वाजले होते. सर्वत्र काळाकुट्ट अंधार होता. अशातच एका दुचाकी वाहनाचा अपघात होतो आणि दुचाकीचालक दुचाकीसह एका खड्डयात पडतात. त्यांची शुध्द हरपते. मात्र दुचाकीवरून बाहेर फेकले गेलेले दोन सात व आठ वर्षांची मुले उठतात आणि तशाही अवस्थेत आपल्या वडीलांसाठी रस्त्यावर येऊन जाणाऱ्या-येणाऱ्यांना मदतीची याचना करतात. अखेर त्यांच्या या संघर्षाला यश येते.
नागभीड येथून काही अंतरावर असलेल्या मोहाळी जवळ घडलेल्या या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. पाहार्णी येथील राजू फुलबांधे हा व्यक्ती आपल्या निखील आणि अर्जुन या सात ते आठ वर्ष वय असलेल्या जुळ्या मुलांसोबत दुचाकी वाहनाने गावाकडे परतत होता. परतत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घुसली आणि राजू गाडीखाली दबल्या गेला. हे होत असताना निखील आणि अर्जुन गाडीवरुन उसळले आणि बाजूला फेकल्या गेले.
प्रसंगावधान राखून निखिल आणि अर्जुन उठले आणि वडिलांची चौकशी केली. वडील गाडीखाली दबल्या गेले होते. यावेळी ते शुद्धीवरही नव्हते. पण ते डगमगले नाही. ते दोघेही रस्त्यावर आले आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना मदतीची याचना करू लागले. पण जवळपास दहा मिनीटे कोणीच या याचनेला प्रतिसाद दिला नाही.
दहा मिनिटानंतर नागभीडकडून कान्पाकडे कोणीतरी व्यक्ती आपल्या कुटुंबासह जाताना या अबोध बालकांना दिसले. त्यांनी या व्यक्तीस हात दाखविला. ती व्यक्ती थांबल्यानंतर या अबोध बालकांनी घडलेली घटना विषद करून मदतीची विनंती केली. नंतर त्या व्यक्तीनेही मदतीसाठी येणाऱ्या जाणाऱ्याकडे विनंती केली. आता मात्र येणारे जाणारे थांबू लागले. पाच-दहा मिनिटात पन्नास लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमला. यातील काहींनी पोलिसांना कळविले. काहींनी रुग्णवाहिकेसाठी १०८ हा क्रमांक डायला केला तर काही राजू फुलबांधेला बाहेर काढण्याच्या कामाला लागले. याच दरम्यान, अनेक लोक त्या दोन मुलांभोवती घोळका करून त्यांना नाना तऱ्हेची प्रश्न विचारत होते. आणि तेव्हढ्याच तत्परतेने ते दोन अबोध बालके त्या प्रश्नांना उत्तरेही देत होती. घटना कशी घडली ते घरच्या लोकांचे मोबाईल नंबरही पटापट सांगत होते. अखेर काही वेळानंतर राजू फुलबांधे यांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. या घटनेत चिमुकल्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.