ग्रामपंचायत निवडणुकीत ३,४५५ नोटाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:32+5:302021-01-25T04:29:32+5:30
राजकुमार चुनारकर चिमूर : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत ७९.६६ टक्के मतदान झाले. यात तब्बल ३ हजार ४५५ मतदारांनी ...
राजकुमार चुनारकर
चिमूर : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत ७९.६६ टक्के मतदान झाले. यात तब्बल ३ हजार ४५५ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. पसंतीचा अथवा योग्य उमेदवार नसल्याने त्यांना नाकारण्याकडे मतदारांचा कल वाढत आहे.
चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या मुदती ऑगस्ट २०२० मध्ये संपल्या होत्या. त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ८५ पैकी चिमूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायती अविरोध झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष ८० ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. ८० ग्रामपंचायतींच्या एकूण सदस्यांपैकी १७९ सदस्य अविरोध आले होते. त्यामुळे ८० ग्रामपंचायतींच्या ४८८ सदस्य पदांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण २६३ प्रभागांसाठी २३१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ८६ हजार ९९३ मतदारांपैकी ७० हजार ४८७ मतदारांनी मतदान केले. ७९.६६ टक्के एवढे मतदान झाले आहे. यात ३३ हजार ९४० महिला मतदारांनी मतदान केले, तर ३६ हजार ५४७ पुरुष मतदारांनी मतदान केले आहे. यात तब्बल ३ हजार ४५५ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.
यात चिमूर तालुक्यात सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. यावरून मतदार आपल्याला हवा असलेला उमेदवार त्या ठिकाणी नसल्यास त्या उमेदवाराला नाकारत असल्याचे स्पष्ट होत आहे.