रेती उपसा करण्यासाठी चक्क स्वयंचलित बोटचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:25 AM2018-02-19T00:25:36+5:302018-02-19T00:26:27+5:30
तालुक्यातील वर्धा नदीच्या मनगाव या गावाजवळील घाटातून चक्क स्वयंचलित बोटीवरील यंत्राद्वारे रेतीचा उपसा करीत असल्याची बाब उजेडात आली आहे.
ऑनलाईन लोकमत
भद्रावती : तालुक्यातील वर्धा नदीच्या मनगाव या गावाजवळील घाटातून चक्क स्वयंचलित बोटीवरील यंत्राद्वारे रेतीचा उपसा करीत असल्याची बाब उजेडात आली आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार आणि त्यांच्या चमूने रविवारी तेथे धाड टाकून एक बोट जप्त केली आहे. नदीच्या पात्रातून अशा प्रकारे रेती काढण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असल्याचे सूत्राने सांगितले.
रेतीला सोन्याचा भाव आला, तेव्हापासून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करुन रेतीचा उपसा केला जात आहे. यात जेसीबी हे यंत्र अग्रेसर आहे. त्यात आता पुढले पाऊल म्हणून नदीच्या पात्रात स्वयंचलित बोटच उतरविण्यात आली आहे. या बोटीवरील यंत्राच्या माध्यमातून रेती उपसा केला जात आहे. या यंत्राने समुद्र खाडीतून रेती काढल्या जाते. परंतु नव्यानेच हे यंत्र याठिकाणी वापरण्यात आले. याद्वारे दिवसाकाठी १०० ते १२५ ब्रास रेती काढल्या जात होती. मनगावचे सरपंच विद्या उईके यांनी या रेती चोरीची तक्रार एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकाराची माहिती मनगाव येथील मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांना होती. परंतु त्यांचे या रेती तस्कराशी साटेलोट असल्याने त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली नाही. गेल्या दीड महिन्यापासून या भागातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात होता. उपसा केलेल्या रेतीची किंमत आजच्या बाजारभावानुसार कोट्यवधीच्या घरात आहे. वापरण्यात आलेली शक्कल ही समुद्राच्या खाडीतून रेती काढण्याकरिता उपयोगात आणली जाते.
परंतु जिल्ह्यात प्रथमच याप्रकारे नदीच्या डोहातून रेती काढण्याचा प्रकार सामोर आला आहे. तहसीलदार महेश शितोळे तसेच नायब तहसीलदार मधुकर काळे आणि त्यांच्या चमूने रविवारी टाकलेल्या धाडीत बोट जप्त करुन तहसील कार्यालयात आणली आहे. यासंदर्भात तहसीलदार शितोळे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.