फळ पिकवताना केमिकलचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:16 AM2019-04-29T00:16:04+5:302019-04-29T00:16:58+5:30
अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या आंब्याच्या हंगामाला सुरूवात झाली. शहरापासून खेडेगावापर्यंत फळविक्रेते गाड्यांवर फळांचा राजा आंबा, चिकु, सफरचंद, केळी, डाळिंब, कलींगड, खरबूज, टरबूज विक्री होत आहे. परंतु बाजारातील ही फळे खरोखर नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत का, याचा विचार कुणीही करत नाही, किंबहुना ही आपली जबाबदारी नाही, असे म्हणून अनैसर्गिकरित्या पिकवलेली फळे खरेदी करीत आहेत. तर दुसरीकडे अनैसर्गिक पिकविलेली फळे घेण्याव्यतिरिक्त बाजारात दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अशी फळे सेवन केल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिल्या जाते. आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असल्याचे आरोग्य विभाग व आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. काही वर्षांपूर्वी राजापुरी, लंगडा, हापूस, केशर, पायरी अशा विविध जातींचे आंबे चंद्रपूरच्या बाजारामध्य अल्प दरात मिळत होते.
आता परिस्थिती बदलली आहे. वेगवेगळ्या जातीचे हे आंबे रत्नागिरी, कोकण, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून आण्यात आले, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेली नाहीत. विविध रसायनांचा वापर करून पिकविल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आंबे, चिकू, केळी ही कार्बाईड विषारी पावडर वापरून किंवा लिक्विडचा वापर करून मोठे व्यापारी गोडाऊनमध्ये सर्रास पिकवितात. त्यानंतर ती फळे बाजारात विक्री जातात. सफरचंदावरसुद्धा वरून व्हॅसलीन किंवा मेनाचा मुलामा लावल्या जातो, अशी माहिती पुढे आली आहे.
द्राक्ष बागावर मोठ्या प्रमाणात विषारी कीटकनाशकाच्या फवरण्या करतात. तर कलींगडावर घातक रासायन इंजेक्शनद्वारे सोडल्या जाते. केळीसुद्धा आरोग्याला घातक असणाºया लिक्विडमध्ये टाकली जातात. त्यानंतर पाण्यातून काढून पिकविण्यात येते. अनैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांच्या सेवनामुळे आरोग्य धोक्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी फळे सेवन न करणे हाच उपाय असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
गावरान आंबे गायब
काही वर्षांपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या आमराईतील आंबे तोडून आणल्या जात होती. परंतु सध्या गावरान आंब्याचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा अल्प पाऊस पडल्याने शेत व आमराईतील आंब्याची झाडे वाळली. गावरान आंबा फक्त नावापुरातच उरला आहे