तेंदूपत्ता पानफळीवर बाल कामगारांचा वापर
By admin | Published: May 26, 2016 02:02 AM2016-05-26T02:02:06+5:302016-05-26T02:02:06+5:30
सध्या सुरू असलेल्या तेंदूपत्ता हंगामादरम्यान पान फळीवर तेंदूपत्ता पुडके पलटविण्यासाठी बाल कामगारांचा वापर करण्यात येत आहे.
धाबा येथील प्रकार : ठेकेदारावर कारवाईची मागणी
गोंडपिपरी : सध्या सुरू असलेल्या तेंदूपत्ता हंगामादरम्यान पान फळीवर तेंदूपत्ता पुडके पलटविण्यासाठी बाल कामगारांचा वापर करण्यात येत आहे. अल्प दरात बालगोपालांकडून कामे करुन घेत कंत्राटदारांक़डून बालकामगार संरक्षण कायद्याचा भंग होत असल्याचे तालुक्यातील धाबा युनिटच्या पानफळीवर दिसून आले.
उन्हाळा ऋतूचे आगमन होताच ग्रामीण भागातील नागरिकांना तेंदूपत्ता संकलनाचे वेध लागते. प्रहरी पासूनच रानावनात जाऊन तेंदूपाने तोड करुन घरी सहकुटुंब त्याचे पुडके बांधण्याच्या कामी लागल्याचे चित्र आज खेड्यापाड्यात दिसून येते. तत्पूर्वी वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट मिळविणारे कंत्राटदार यांचेही तालुक्यात आगमन होते. दरवर्षी चालणाऱ्या या हंगामी उद्योगात ग्रामीण भागातील अनेक कुटुंब व्यस्त असतात. अशातच कंत्राटदार हे तेंदूपत्ता संकलनातून विक्रीस आणलेले पुडके नागरिकांकडून फळीवर (ठिय्या) येथे खरेदी करतात. ओलसर तेंदूपत्यांना वाळवून बिडी व अन्न उद्योगाकरिता याची वाहतूक परराज्यात केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मौजा धाबा येथील युनिट कंत्राटदाराच्या वतीने संकलित तेंदूपत्ता पुडके वाळविण्यासाठी व पलटविण्यासाठी धाबा नाल्यानजीकच्या फळीवर बाल कामगारांचा वापर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता तेंदूपत्ता फळीवर पुडके पलटविण्यासाठी उन्हाळा ऋतूत शाळेला सुट्टी असलेले बालगोपाल यांना ५ ते १० रुपयांचे प्रलोभन देऊन त्यांच्यामार्फत ही कामे करवून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाली. एकीकडे शासनाने सर्वशिक्षा अभियान, सक्तीचे शिक्षण, सर्वांना शिक्षणाचा अधिकार आधी योजनांतून कोट्यवधीचा खर्च करुन कोणताही बालक शाळाबाह्य राहू नये तसेच राज्यात व देशात बाल कामगारांचा वापर करणे, यासाठी स्वतंत्र कायदा केला असताना परराज्यातून येणाऱ्या या तेंदूपत्ता हंगामी कंत्राटदारांकडून शासन नियम पायदळी तुडविल्या जात आहे.
सध्या जिल्ह्याचे तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले असून रखरखत््या उन्हात केवळ पाच ते १० रुपयांचे प्रलोभन देऊन धाबा युनिट कंत्राटदाराकडून बाल कामगारांचा सर्रास वापर केला जात आहे. चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर बाल कामगार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)