दूषित भांडी वापरणाऱ्यावर मनपा कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:13 AM2018-08-31T00:13:15+5:302018-08-31T00:15:03+5:30
डेंग्यू रोगावर प्रतिबंधासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतचा आढावा मनपा आयुक्त संजय काकडे यांनी चंद्र्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डेंग्यू रोगावर प्रतिबंधासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतचा आढावा मनपा आयुक्त संजय काकडे यांनी चंद्र्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतला. यावेळी डास अळी आढळणारी भांडी रिकामी न करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे नोटिस बजावावे, त्याद्वारे नमूद कार्यवाही न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले. यावेळी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.
नगरसेवकांच्या सहकार्याने त्यांच्या वॉडार्तील पाणी साचलेल्या जागांवर मनपा स्वच्छता निरीक्षकांद्वारे गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. शहरात धुरीकरण व औषध फवारणी सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी प्राधान्याने शाळांमध्ये आणि रुग्णालयात जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी जनजागृतीपर पत्रकांचे वाटपही शहरात करण्यात आलेले आहे. एमपीडब्लू, एनएम व आशा वर्कर्समार्फत तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व औषधोपचाराचे कार्य सुरु आहे. दूषित पाणी आढळल्यास आवश्यक तेथे अबेट, टेमिफॉस औषधी टाकण्यात येत आहे. तसेच आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र स्वच्छता, पाणीसाठ्याची तपासणी, फवारणी, धूरळणी मनपातर्फे सातत्याने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मनपाच्या तिनही झोन मिळून ७ स्वच्छता निरीक्षक आहेत. त्यांना प्रत्येकी चार स्वच्छता कर्मचारी देण्यात आलेले आहेत. ७ पोर्टेबल फॉगिंग मशीन, १ व्हेईकल माऊंटेड, फॉगिंग मशीन व फवारणी पंपांच्या मदतीने शहरात दररोज २८ कर्मचाऱ्यांमार्फत नियमित औषध फवारणी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी आयुक्तांनी विविध सुचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त बेहेरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आंबटकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल कुकडापवार, डॉ. मन्सूर चिनी, डॉ. नितीन कापसे, डॉ. नरेंद्र जनबंधू आदी उपस्थित होते.
डेंग्यू रुग्ण आढळल्यास मनपाला माहिती द्या
डेंग्यू हा विषाणूजन्य व नोटीफायेबल आजार असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला कळवावी, याबाबत आयमएच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या सर्व सदस्य डॉक्टरांना सूचित करण्यास सूचना आयुक्तांनी आयमए सचिव डॉ. मन्सूर चिनी यांना दिल्या. त्याचप्रमाणे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात भेट देऊन याबाबत खात्री करावी व माहिती गोळा करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.