डांबरी रोडच्या मजबुतीकरिता प्लास्टिकचा वापर
By admin | Published: February 5, 2017 12:30 AM2017-02-05T00:30:54+5:302017-02-05T00:30:54+5:30
डांबरी रोडच्या कामात डांबरासोबतच प्लास्टिकचाही वापर केल्यास रोडला मजबुती मिळते, हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
प्रथमच बल्लारपूर नगर पालिकेने केला प्रयोग
बल्लारपूर : डांबरी रोडच्या कामात डांबरासोबतच प्लास्टिकचाही वापर केल्यास रोडला मजबुती मिळते, हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. या कारणाने, बल्लारपूर नगर पालिकेने डांबरी रोडच्या कामात प्लॉस्टिकचा वापर करणे सुरू केले आहे. सध्या येथील विद्यानगर वार्डात ३६० मीटर लांबीच्या डांबरी रोडचे काम चालू आहे. त्यात आजवर १५०० किलो प्लॉस्टिक डांबरासोबत उपयोगात आणल्या गेले आहे. असा प्रयोग करणारी बल्लारपूर नगरपालिका विदर्भात पहिलीच आहे, असे सांगण्यात येते.
ही संकल्पना चंद्रपूर रोटरी क्लबचे सदस्य डॉ.बालमुकूनद पालीवाल यांनी बल्लारपूर नगरपालिकेपुढे मांडली. त्यानुसार कचरा म्हणून जमा झालेल्या प्लॉस्टिकचे न.प.च्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील मशीनने प्लॉस्टिकचे थ्रेडींग (बारीक बारीक तुकडे) करण्यात येऊन त्यांना गिट्टीत मिसळण्यात आले व प्लास्टिक मिश्रीत गिट्टी व डांबरात एकजीव झाले. अशा त्रिमिश्रीत मसाल्याचा वापर रोड कामात नगर पालिका करीत आहे. याने रोड मजबूत होतो आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभते, असे संबंधितांचे म्हणणे आहे. कचऱ्यात प्लॉस्टिकचे प्रमाण नेहमीच अधिक असते. त्या टाकाऊ प्लॉस्टिकचे व्यवस्थापन कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होतो.
डांबरी रोडच्या कामात प्लॉस्टिकचा वापर करता येतो, या प्रयोगामुळे प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न काही अंशी सुटण्याला मार्ग मिळाला, असे न.प. चे मुख्याधिकारी विपीन मुद्धा हे लोकमतशी याबाबत माहिती देताना म्हणाले. हा प्रयोग प्रत्यक्ष कृतीत आणण्याकरिता नगरपालिकेचे नगर अभियंता संजय बोढे, सहायक अभियंता प्रशांत मून, अमृता नाईक, तांत्रीक सहायक किशोर संगीडवार, संजय पावडे, यांनी परिश्रम घेतले. याकामाकरिता नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी यांनी साऱ्यांना प्रोत्साहित केले. टाकाऊ प्लॉस्टिकची या प्रयोगाने विल्हेवाट तर लागलीच, रोडच्या कामात डांबराचा खर्च ही कमी झाला आहे आणि रोडला प्लास्टिकमुळे मजबुती मिळत आहे, असा तिहेरी फायदा यामुळे होत आहे, हे येथे उल्लेखनीय! (तालुका प्रतिनिधी)