संशोधनाचा उपयोग समाजासाठी होणे गरजेचे
By admin | Published: January 9, 2017 12:44 AM2017-01-09T00:44:04+5:302017-01-09T00:44:04+5:30
संशोधनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असायला हवा. या संशोधनाचा उपयोग समाजासाठी होणे गरजेचे आहे.
कल्याणकर : आविष्कार-२०१६ चे उद्घाटन
चंद्रपूर : संशोधनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असायला हवा. या संशोधनाचा उपयोग समाजासाठी होणे गरजेचे आहे. ते सामाजिक विकासासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधन उत्सवांतर्गत अविष्कार २०१६ च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेशपंत मामीडवार, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल साकुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन समितीचे समन्वयक डॉ. विजय वाढई प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. कल्याणकर म्हणाले, संशोधन ही महत्वापूर्ण बाब असून ते होणे गरजेचे आहे. पण आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत संशोधन झपाट्याने सुरु असताना मात्र सामाजिक शास्त्रात संशोधन नगण्य दिसून येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी रमेश मामीडवार, शांताराम पोटदुखे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. पी. इंगोले यांनी केले.
यावेळी अविष्कार २०१६ अंतर्गत दालनातील पोस्टर व प्रतिकृती मान्यवरांनी बघितल्या. यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील संगणक शास्त्रातून विद्यापीठातून पहिली पीएचडी संपादन करणाऱ्या असलम याकूब सुरिया, मार्गदर्शक डॉ. एस. किशोर व डॉ. विजय वाढई यांचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवात गोंडवाना विद्यापीठातील ३५ महाविद्यालयातील १३२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी लक्ष्यवेधक प्रतिकृती सादर केल्या गेल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संशोधन समितीचे डॉ. विजय वाढई, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. एस. बी. किशोर, डॉ. शरयू पोतनुरवार, प्रा. कविता रायपूरकर, डॉ. रक्षा धनकर, यांनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)