मतदारांकडून १८५३ वेळा टोल फ्रीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:54 PM2019-04-01T21:54:49+5:302019-04-01T21:55:13+5:30

सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत.

Use of toll free 1853 times from voters | मतदारांकडून १८५३ वेळा टोल फ्रीचा वापर

मतदारांकडून १८५३ वेळा टोल फ्रीचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देमतदारांचा उत्तम प्रतिसाद : भाजपा ५१, काँंग्रेसविरोधात १० तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत. मतदारांना सहजरीत्या संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करता यावे, यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसात या टोल फ्री क्रमांकावर तब्बल १ हजार ८५३ फोन कॉल आले असून अनेक मतदारांना शंकेचे निरसन केले आहे. विशेष म्हणजे, या नंबरवर काहींनी तक्रारही केल्या आहे. यामध्ये भाजपाविरुद्ध ५१, तर काँग्रेसविरुध्द १० तक्रारींचा समावेश आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा मतदार संघातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे का? असेल, तर नावामध्ये काही चुका आहे का? याची माहिती मतदारांना घरबसल्या घेता यावी, यासाठी निवडणूक विभागाने टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या क्रमाकांवर येणाऱ्या फोन कॉलची संख्या वाढली आहे.
ही सेवा २४ तास सुरु आहे. आजवर या टोल फ्री क्रमांकावर तब्बल १ हजार ८५३ जणांनी फोन कॉल करुन आपल्या शंका, अडचणी मांडल्या आहेत. १९५० या क्रमांकावर मतदारांनी नोंदविलेल्या प्रत्येक शंकेचे निसरन करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

अधिकारी, कर्मचारीही करताहेत फोन कॉल
मतदार टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार यादीमध्ये आमचे नाव आहे का? नवीन आॅनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे का? आमचे मतदान ओळखपत्र मिळाले नाही, नाव दुरुस्ती करता येईल का? आॅनलाईन फॉर्म कसा भरावा? असे विविध प्रश्न मतदार विचारत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारीही टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन इलेक्शन ड्युटीचा भाग क्रमांकासह विविध माहिती घेत आहेत.

केंद्राबाबत विचारणा
ग्रामीण भागातील मतदारांना मतदार केंद्र शोधण्याची गरज पडत नाही. परंतु शहरातील एकाच भागात अनेक मतदान केंद्र असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या केंद्रावर आपले मतदान आहे? याची अनेकांना माहिती नसते. याच अनुषंगाने विशेषत: शहरी भागातील मतदार आमचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे, अशी विचारणा १९५० क्रमांकावर करीत आहेत.

तातडीने रिस्पॉन्स
ग्रामीण अथवा शहरी भागातील मतदारांनी टोल फ्री क्रमांकावर फोन कॉल केल्यानंतर संबंधित मतदाराला उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तातडीने रिस्पॉन्स दिला जात आहे.त्यामुळेच मागील काही दिवसात फोन कॉलची संख्या वाढली आहे.

१९५० वर ७१ तक्रारी
१९५० या नंबरची सेवा सुरु केल्यांनतर नागरिक सतर्क झाले आहे. त्यानुसार नागरिक या नंबरवर तक्रारसुद्धा करीत आहे. यामध्ये ७१ तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारींपैकी तब्बल ५१ तक्रारी भाजपाविरुद्ध, तर १० तक्रारी काँग्रेसविरुद्ध आहे. अन्य १० तक्रारी विविध अपक्ष उमदेवारांविरुद्ध आहे.

शंकेचे निरसन
दोन महिन्यापूर्वी सुरु केलेल्या या सहाय्यता नंबरवर आचारसंहितेपूर्वी म्हणजे १० मार्च पूर्वी केवळ ३४९ कॉल आले होते. आचारसंहितेनंतर यात वाढ झाली. १ एप्रिलपर्यंत तब्बल १८५३ जणांनी कॉल करुन शंकेचे निरसन करुन घेतले.

जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तक्रारीसुद्धा या नंबरवर घेण्यात येत आहे. या नंबरचा मतदारांना लाभ होत आहे.
- संजय डांगे, सहाय्यक, जिल्हा मदत केंद्र.

Web Title: Use of toll free 1853 times from voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.