विना नंबर प्लेटच्या वाहनांचा वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:49+5:302021-02-08T04:24:49+5:30
चंद्रपूर : रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट ...
चंद्रपूर : रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देतात, परंतु अलीकडे जिल्ह्यात विना नंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विना नंबरची अनेक जुनी वाहनेही रस्त्यावरून धावताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर नागपूर रस्त्यावर स्टंटबाजी करताना, एका निरपराध दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने स्टंटबाजी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, बिना नंबर प्लेट वाहनचालक बिनधास्तपणे आपले वाहन दामटत आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
काही आकस्मिक प्रसंग निर्माण झाला, तर परिस्थिती कशी हाताळावी, अशी चिंता नागरिकांना पडली आहे. वाहतूक विभागाने रस्त्यावरून धावणाऱ्या या विना क्रमांकाच्या वाहनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अनेक जण इतक्या सुसाटपणे वाहन पळवतात की, रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्धांना धडकी भरते. त्यांच्या अतिउत्साही गाडी चालविण्याच्या नादात रस्त्यावरील पादचारी व इतरही वाहनचालकांवर केव्हा, कोणता अप्रिय प्रसंग ओढावेल, हे सांगता येत नाही. वाहनचालकांचा वेग एवढा अमर्यादित असतो, त्यातही भरीस भर म्हणजे रस्त्यावरून धावणाऱ्या अनेक वाहनांवर नंबर प्लेटच दिसून येत नाही, तर अनेक वाहने त्रोटक नंबरची असतात. अशा विना नंबरच्या वाहनांकडून काही अप्रिय घटना घडल्यास ते वाहन कसे लक्षात ठेवायचे, अशी परिस्थिती आहे.
रस्त्यावरून नंबरच्या वाहनांपेक्षा विना नंबरचीच वाहने अतिशय वेगाने पळविली जातात. त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.