उसगाववासीयांनी तब्बल तीन तास रोखली कोळसा वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 05:00 AM2021-09-27T05:00:00+5:302021-09-27T05:00:47+5:30
रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही कोळसा वाहतूक बंद झाली नसल्याने रविवारी उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नांदेडकर घटनास्थळी दाखल झाले व सरपंच, एसीसीचे सुरक्षा अधिकारी जोगेंद्रसिंग यांच्याशी चर्चा करून रस्त्यावर तत्काळ बॅरिकेड लावून कोळसा व जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय झाल्याने तीन तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मनाई असतानाही वाहतूक सुरूच
उसगाव ते एसीसी हद्दीपर्यंत ग्रामपंचायतने सीएसआर फंडातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र या रस्त्यावरून पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकदाराकडून कोळसा वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेषतः कोळसा वाहतूक तारपोलीन न बांधता होत असल्याने वाहनातून कोळसा खाली पडून रस्त्याने दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा वाहतूक एसीसी-घुग्घुस सिमेंट मार्गाने करण्यास मनाई असली तरी कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपन्या या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने घुग्घुस गावातील लोकांना वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत होता. या संदर्भात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र काहीही झाले नाही. प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडविण्याची वेळ आली.