वैद्यकीय सल्ल्याविना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरणे घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:08+5:302021-05-12T04:29:08+5:30
चंद्रपूर : कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाले तर उपचाराला सुरुवात होण्यापूर्वी काही काळासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत उपयुक्त ठरते. ...
चंद्रपूर : कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाले तर उपचाराला सुरुवात होण्यापूर्वी काही काळासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत उपयुक्त ठरते. त्यामुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या वैद्यकीय उपकरणाचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या उपकरणाने आतापर्यंत बऱ्याच कोविड रुग्णांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या उपयोगितेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी साधलेला संवाद...
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपयोगिता काय?
ज्या कोविड रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी आहे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईपर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा फायदा होतो. शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली म्हणजे याचा वापर झालाच पाहिजे असे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या उपकरणाचा घरी कदापि वापर करू नये. रुग्णाला ऑक्सिजन मास्क, ट्यूब व कॅन्युलाद्वारे प्राणवायू दिला जातो. पुढील उपचारासाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हवेतून ऑक्सिजन मिळत असल्याने सिलिंडर बदलविण्याचा प्रश्न नाही. हे उपकरण विजेवर चालते.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गुणवत्ता कशी ओळखणार?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे काही प्रकार आहेत. रुग्ण स्वत:हून ऑक्सिजन घेत नसल्यास हे मशीन दर मिनिटाला ऑक्सिजन पुरवठा करीत राहते. श्वास घेण्याच्या पॅटर्ननुसार ऑक्सिजन पुरविण्याचे कॉन्सन्ट्रेटर आहेत. रुग्णाला ऑक्सिजन जास्तही नको आणि कमीपण नको. गरजेपेक्षा जास्त दिल्यास रुग्णाच्या प्रकृतीला धोका आहे. काही व्यक्ती व सेवाभावी संस्था शासकीय कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देणे सुरू केले. ही चांगली बाब आहे. मात्र, हे वैद्यकीय उपकरण खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तीन लिटरपासून दहा लिटरपर्यंत ऑक्सिजन पुरविणारे उपकरण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे दर्जेदार कंपन्यांचाचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्यावा.
ऑक्सिजन थेरपीबाबत कशी काळजी घ्यावी?
कोविड संसर्गाचा सर्वात मोठा परिणाम रुग्णाच्या फुप्फुसावर होतो. रुग्ण बऱ्याच कालावधीसाठी
हाय-फ्लो ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरवर राहिल्यास गंभीर समस्या निर्माण होतात. फुप्फुस निकामी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सिजन सिलिंडर असो की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यातून रुग्णाला प्राणवायू पुरविताना खबरदारी घ्यावी लागते. अशा रुग्णांवर ऑक्सिजन थेरपी करणे मोठी जोखीम असते. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांनी एक्साइट न होता डॉक्टरांना निर्णय घेऊ दिला पाहिजे.
कोविड रुग्णाला मशीनमधून ऑक्सिजन कसा पुरविला जातो?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या एका पोर्टमधून ऑक्सिजन बाहेर निघतो. याला एक ट्यूब असल्याने ती नाकाला लावली जाते. ऑक्सिजन मास्क असेल तर तोंडावर लावला जातो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. हे उपकरण सहा-सात वेळा वापरल्यानंतर काही तासासाठी बंद ठेवावे लागते. वैद्यकीय सल्ल्याशिवाय याचा वापर करता कामा नये.
बॉक्स
असे आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपकरण विजेवर चालविता येते. फुप्फुसाचे आजार तसेच कोविड रुग्णांना गरज पडल्यास या उपकरणाद्वारे ऑक्सिजन देता येऊ शकतो. सभोवतीच्या वातावरणात २१ टक्के ऑक्सिजन आणि ७८ टक्के नायट्रोजन आहे. वातावरणातील विविध अपायकारक घटक बाजूला करून हे उपकरण रुग्णाला ऑक्सिजन पुरविते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने राजुरा, वरोरा, चिमूर, मूल व ब्रह्मपुरी तालुक्यात नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासोबतच १४०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला हे येथे उल्लेखनीय.