पशु वैद्यकीय दवाखान्यातील पदे रिक्त
By Admin | Published: January 31, 2016 01:01 AM2016-01-31T01:01:08+5:302016-01-31T01:01:08+5:30
सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी वर्गाची संख्या अधिक आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे.
गुंजेवाही : सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी वर्गाची संख्या अधिक आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. शेती व्यवसायाकरिता बैलजोडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. या पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात व ग्रामीण भागात पशुवैद्यकीय चिकित्सालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सिंदेवाही पंचायत समितीमधील अनेक पशु चिकित्सालयातील पदे रिक्त आहेत.
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे पद रिक्त तसेच सिंदेवाही पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चे पशुधन विकास अधिकारी, मरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ पशुधन विकास अधिकारी व दोन परिचर, गुंजेवाही येथील आधारभूत पशुसुधार केंद्र येथील परिचर पद इत्यादी रिक्त पदे भरण्याबाबत शासन उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे.
तालुक्यातील शेतकरीवर्गाकडे बैल, गाई, म्हशी-शेळ्या आदी पाळीव पशु आहेत. या पशुधनावर रोगांचा प्रादूर्भाव होऊन त्यांची जीवितहानी होऊ नये, यासाठी तालुक्यातील गुंजेवाही, नवरगाव, वासेरा, सिंदेवाही, मरेगाव, नांदगाव, पळजगाव (जाट) व कुकडहेटी येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय आहेत. मात्र सदर दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व परिचर पदे रिक्त असल्यामुळे पशुधनावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी परिचरच्या भरोशावर सदर पशुधन दवाखाना सुरू आहे. याचा परिणाम पशुधनावर होताना दिसून येत आहे.
सदर रिक्त पदाबाबत पंचायत समिती स्तरावरुन वरिष्ठस्तरावर अनेकदा पत्र व्यवहार करूनही त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली जात आहे. तसेच भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ अन्वये सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांना नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सेवा द्यावी लागते. त्यांना स्वतंत्रपणे पशुसेवा देण्याचा अधिकार नसल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासन स्तरावरुन पशुवैद्यकीय दवाखाण्यात औषध पुरवठा करणे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरावर खासगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करण्याची पाळी आली आहे.