१५ गावांचा डोलारा असलेल्या राजोली आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:31 PM2024-10-23T14:31:32+5:302024-10-23T14:33:33+5:30

आरोग्य सुविधा पुरविताना अडचण : रिक्त पदे भरण्याची मागणी

Vacancy at Rajoli Arogya Kendra which is a single hospital for 15 villages | १५ गावांचा डोलारा असलेल्या राजोली आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण

Vacancy at Rajoli Arogya Kendra which is a single hospital for 15 villages

राजू गेडाम 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मूल:
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मूल तालुक्यातील राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत निर्माण करण्यात आली. इमारतीनंतर रिक्त पदे भरली जातील, असा आशावाद जनतेत होता. मात्र वर्ष लोटत असतानादेखील रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यामुळे १५ गावांचा भार पेलवता पेलवत नसल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.


ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यांना लांब अंतरावर जाऊन उपचार करणे कठीण असते. रुग्णांना गावाजवळच उपचार करता यावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील राजोली व परिसरातील गावांची लोकसंख्या २० हजार ५०० असून, यात १५ गावे येतात. यात राजोली, डोंगरगाव, चिखली, चितेगाव, बेलघाटा तसेच नवेगाव, लोनखैरी, मूरमाडी, ताडभूज व गोलभुज या जंगलव्याप्त गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. परंतु, रिक्त पदामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा रिक्त पदे भरण्याबाबत परिसरातील नागरिकांनी मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 


ही पदे आहेत रिक्त

  • प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका, शिपाई व औषधी संयोजक ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. औषधी संयोजक पद रिक्त असल्याने कुठली औषधी आणायची यांचे ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक असलेली औषधी नसल्याचे दिसून आले. 
  • परिचारिकेचे पद रिक्त असल्याने एकाच परिचारिकेवर भार पडत आहे. देखभाल व इतर माहितीसाठी शिपाई पद रिक्तच आहे. त्यामुळे त्याचाही भार एकूण वैद्यकीय प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला योग्य उपचार करण्यासाठी रिक्त पदाचे ग्रहण हटविण्याची मागणी जनतेनी केली आहे.


"प्राथमिक आरोग्य केंद्र राजोली येथे आवश्यक असलेले दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना आवश्यक उपचार केले जात आहेत. मात्र परिचारिका, शिपाई व औषधी संयोजक ही पदे रिक्त असल्याने काहीसा त्रास आरोग्य प्रशासनाला होताना दिसत आहे. रिक्त पदे भरल्यास रुग्णाला सोयीचे होईल." 
- रामेश्वर बावणे, तालुका वैद्यकीय अधिकारी मूल

Web Title: Vacancy at Rajoli Arogya Kendra which is a single hospital for 15 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.