नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गोंडपिपरी तालुक्याला रिक्त पदाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:37+5:302021-03-06T04:27:37+5:30
वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी : जिल्हा सीमेवर वसलेल्या ९८ गावांचा विस्तारित तालुका तसेच नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व अतिदुर्गम तालुका म्हणून ...
वेदांत मेहरकुळे
गोंडपिपरी :
जिल्हा सीमेवर वसलेल्या ९८ गावांचा विस्तारित तालुका तसेच नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून विविध महत्वपूर्ण विभागाचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर लादून शासन चालवीत असल्याने तालुक्याचा विकास खुंटला आहे. यामुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुक्याला लागलेले हे ग्रहण केव्हा सूटणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शासन युद्धपातळीवर प्रयत्न चालवून कोट्यवधींचा खर्च करून
देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासीबहुल व दुर्गम तालुक्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असताना चंद्रपूर जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्याकडे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुर्लक्ष करीत आहे. सदर तालुक्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी येथे विविध विभागाचे कार्यालय तर स्थापन झाली मात्र कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी प्रभारीच्या खांद्यावर लाभल्याने शासनाच्या अनेक योजनांचा प्रचार व प्रसार होत नाही. संपूर्ण विकास कामांचा बट्ट्याबोळ होत असल्याचे जनसामान्यांना जाणवत आहे. येथील तालुका स्तरावर अतिशय महत्त्वाचे म्हणून महसूल विभागाच्या प्रशासकीय अशा नायब तहसीलदार पदाच्या दोन जागा, तसेच मंडळ अधिकाऱ्यांची एक जागा रिक्त आहे. यामुळे तालुक्यात रेती माफियांनी अवैधरित्या रेती उत्खननाचत सपाटा सुरू केला असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. दररोज रात्री मोठमोठ्या टिप्परच्या सहाय्याने नदी घाटामधून पोकलेनद्वारे खनन करून वाहतूक केली जात आहे. तर आरोग्य विभागाच्या महत्त्वपूर्ण अशा ग्रामीण रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी व अन्न कर्मचाऱ्यांच्या ही जागा रिक्त आहे.
बॉक्स
शिक्षण विभागातही पदे रिक्त
ग्रामीण भागातील निराक्षरतेवर मात करण्याकरिता जिल्हा परिषदेतर्फे शैक्षणिक पाया भरीव करणाऱ्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी हे पद गेल्या अनेक वर्षापासून प्रभारी विस्तार अधिकार्यांकडे सोपविलेले आहे.
बॉक्स
पोलीस विभागही तोकडा
ग्रामीण तथा शहरी स्तरावरील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सशक्त अशा पोलीस विभागातील गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे पद गेल्या वर्षभरापासून एका प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविल्याने तालुक्यात तसेच सहाय्यक फौजदार व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शहरात अवैद्य दारू विक्री, जुगार, सुगंधित तंबाखू विक्री व वाहन चोरी आदींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. शहर व ग्रामीण भागातील जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बॉक्स
नगरपंचायतीतही प्रभारीच
गोंडपिपरी शहराचा विकासाचा महत्त्वपूर्ण भार असलेल्या नगरपंचायतीवर स्थायी मुख्याधिकारी व शाखा अभियंते हे पद प्रभारीच्या खांद्यावर लादले असल्याने शहरातील नागरिकांना वेळोवेळी नगरपंचायतीच्या शासकीय कामकाजाकरिता गेले असता मुख्याधिकारी, अभियंते व अन्य अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कामाचा खोळंबा वाढला आहे.