कोठारी आरोग्य केंद्रात पात्र लोकसंख्येच्या १० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:32+5:302021-06-29T04:19:32+5:30
कोठारी : तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावाचे १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ...
कोठारी : तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावाचे १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास येत असले तरी गाफील राहून चालणार नाही. असे जिल्हा तथा शासन स्तरावरून दिशा निर्देश होत असले तरी ग्रामीण भागात जनजागृतीच्या अभावाने लसीकरणाची टक्केवारी कमी प्रमाणात दिसून येत आहे.
कोठारी आरोग्य केंद्रात आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या १० टक्के लसीकरण झाले असून ९० टक्के लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती कायम आहे. लसीकरणाबाबत नागरिकांत संभ्रम असल्याने प्रभावीपणे जनजागृती अभियान राबविण्याची नितांत गरज भासू लागली आहे.
कोठारी आरोग्य केंद्रांतर्गत स्थानिक एक लसीकरण केंद्र व पळसगाव, मानोरा अशी दोन उपकेंद्रं दिली आहेत. प्राप्त माहितीनुसार कोठारी लसीकरण केंद्रात पात्र ६,८७५ लोकसंख्येच्या तुलनेत एकूण २७ सत्रात १,१७८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पळसगाव उपकेंद्रात पात्र ४,११३ लोकसंख्या, ११ सत्र, ४६१ नागरिकांचे लसीकरण व मानोरा उपकेंद्रात ५,३२५ लोकसंख्येच्या तुलनेत ८ सत्रात २४५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकूण १६,३१३ लोकसंख्येच्या तुलनेत १८८४ पात्र नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे.