जिल्ह्यात एक लाखांवर विद्यार्थ्यांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:37 PM2018-12-04T22:37:29+5:302018-12-04T22:38:34+5:30
जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून आजपर्यंत जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण दोन हजार ६५४ शाळांपैकी ८५० शाळांमधून एक लाख सात हजार २१ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून आजपर्यंत जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण दोन हजार ६५४ शाळांपैकी ८५० शाळांमधून एक लाख सात हजार २१ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे. याकरिता पालक व विद्यार्थी यांचा उत्स्फर्त सहभाग लाभत आहे. मनपातर्फे जिल्ह्यातील नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व विभाग सर्वतोपरी प्रयत्नरत आहेत.
३ डिंसेंबरला वियानी विद्या मंदिर घुग्घुस येथे स्थानिक मान्यवरांच्या हस्ते गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जि. प. सदस्य नितू चौधरी, समन्वयक डॉ. श्रीधरण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, प्राचार्य रॉबर्ट निकोस घुग्घुस, अनंता बहादे, डॉ. माधुरी मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे आदी उपस्थित होते.
भारत सरकारने सन २०२० सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पाच आठवडयाच्या कालावधीमध्ये मोहिम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सीबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विद्यालय, आदी शाळामध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहिम आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बालविकास विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.
विविध रोगाला आळा बसणार
गोवर हा अत्यंत संक्रामक आजार आणि घातक आजार आहे. हा मुख्यत: लहान मुलांना होतो. या आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नविन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा, मतिमंदत्व, हृदय विकृती होवू शकते. मात्र लसीकरणातून यावर आळा बसणार आहे.