अस्थायी कर्मचाऱ्यांचे केले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:29+5:302021-05-17T04:26:29+5:30
मूल : येथील स्थायी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत लसीकरण करण्यात आले. मात्र, अस्थायी कर्मचारी, सफाई कामगारांना रोज गर्दीमध्ये ...
मूल : येथील स्थायी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत लसीकरण करण्यात आले. मात्र, अस्थायी कर्मचारी, सफाई कामगारांना रोज गर्दीमध्ये काम करावे लागत असतानाही लसीकरण करण्यात आले नाही. यामुळे कामगारांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. याबाबत नगरपरिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी सदर अस्थायी कर्मचाऱ्यांना तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत एका दिवसात सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.
मूल नगरपालिकेत शेकडो सफाई कामगार अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. सदर कामगार रोज सकाळी गावात फिरून कचरा संकलनाचे काम करीत असतात, यांच्यामुळेच गावाची स्वच्छता राखली जाते. स्थायी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण करण्यात आले. मात्र, मागील अनेक दिवसांपासून अस्थायी कर्मचाऱ्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत होते, याबाबत काही कामगारांनी लसीकरणाची मागणी नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ व काही नगरसेवकांकडे केली होती. सदर मागणीनुसार क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून उपविभागीय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत, एका दिवसात संपूर्ण अस्थायी कर्मचारी, सफाई कामगारांसाठी एक विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करून सर्वांचे लसीकरण करण्यात आले.
या विशेष शिबिरासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या नेतृत्वात नगरपरिषद आरोग्य व स्वछता पर्यवेक्षक अभय चेपूरवार, डॉ.पूजा महेशकर, आशा निखाडे, नूतन भडके, राजेश्वरी मोकलेलु, अपर्णा अन्नमवार, तसेच नगरपरिषद आणि आरोग्य कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.