इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमधील वैदिशाची संगीत क्षेत्रातही भरारी!
By परिमल डोहणे | Published: September 14, 2022 01:39 PM2022-09-14T13:39:47+5:302022-09-14T13:40:31+5:30
वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे बँक ऑफ इंडिया, शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे प्रबंधक या पदावर कार्यरत असून नुकतेच अकोला येथे स्थानापन्न झाले.
चंद्रपूर : जगातील सर्व देशांच्या राजधान्या व त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम करून वयाच्या अडीच वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करणाऱ्या वैदिशा शेरेकर हिने आता संगीत क्षेत्रातही भरारी घेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे घेतलेल्या परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे बँक ऑफ इंडिया, शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे प्रबंधक या पदावर कार्यरत असून नुकतेच अकोला येथे स्थानापन्न झाले. आई दीपाली शेरेकर या गृहिणी आहेत. वैदिशा ही यांची एकुलती एक मुलगी. वैदिशाची असाधारण बुद्धिमत्तेने तिने वयाच्या अडीचव्या वर्षीच इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली. तिचा आवाज मधुर असल्याचे लक्षात येताच तिच्या आई-वडिलांनी वरोरा येथील सूर सरगम अकॅडमी येथे संगीत क्लास लावला. संचालिकेने वैदिशाची गायनाची पद्धत, तिचे उच्चार व आवाज ऐकताच अचंबित झाल्या. त्यांनी परीक्षेला बसण्यास सांगितले. त्यातही वैदिशाने ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. एवढ्याशा वयात ही परीक्षा उत्तीर्ण करणे ही जिल्हावासीयासांठी आनंदाची बाब आहे.
कमी वयामुळे केला परीक्षेचा अर्ज रद्द
वैदिशाच्या वडिलांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचा अर्ज भरला. मात्र, तिचे वय कमी असल्याने तिला परीक्षेला बसता येणार नाही, दोन-तीन वर्षांनंतर प्रयत्न करा, असे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे वैदिशाच्या वडिलांना कळविण्यात आले. दरम्यान शेरेकर त्यांनी तिच्या असाधारण बुद्धिमत्तेची कल्पना व तिने केलेली देदीप्यमान कामगिरीबाबत त्यांना माहिती देत परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. मुंबई मंडळाच्या तज्ज्ञांनी परीक्षा देण्यास सहमती दर्शवली. सत्राच्या शेवटी मुंबई येथील चमूने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत लोकमान्य विद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे परीक्षा घेतली. त्यात ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. एवढ्या कमी वयात अचूक पाठांतर, कठीण असलेले स्वर, राग, थाट आदी संगीत विषयाच्या बाबी लक्षात ठेवणे हे एक आश्चर्यच असल्याची प्रतिक्रिया मुंबई मंडळाच्या तज्ज्ञांनी दिल्याचे वैभव शेरेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.