राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैष्णवीची बाजी
By Admin | Published: April 20, 2017 01:37 AM2017-04-20T01:37:31+5:302017-04-20T01:37:31+5:30
नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिखितवाडा येथील वैष्णवी नरेश बांगरे हिने सादर
प्रयोगाला मिळाला प्रथम क्रमांक : वनौषधीतून दंत्तमंजन, धुपबत्तीचे प्रात्यक्षिक
गोंडपिपरी : नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिखितवाडा येथील वैष्णवी नरेश बांगरे हिने सादर केलेल्या प्रयोगाला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. दुर्धर आजार असलेल्या शिक्षकाच्या मदतीने तिने हे यश संपादन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी काही कमी नाही. आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करुन त्यात ते यश मिळवू लागले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सातवीची विद्यार्थिनीने वैष्णवीने हे सिद्ध केले आहे. सांगली येथे ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. त्यात गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा लिखितवाडा येथील सातवीत शिकणाऱ्या वैष्णवी बांगरे हिने आपला प्रयोग सादर केला. तिने शिक्षक एस. आर. मिरदोड्डीवार यांच्या मार्गदर्शनात ‘नैसर्गिक वनौषधीपासून निर्मिती धूपबत्ती, अगरबत्ती व दंतमंजन’, हा प्रयोग सादर करुन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलातील विविध प्रकारच्या वनऔषधी मानवासाठी उपयुक्त आहेत. या वनऔषधीचा मानवी जिवनाला मोठा लाभ घेता येऊ शकतो या उद्देशाने वैष्णवीने प्रयोग तयार केला. त्यातून दंतमंजन, धुपबत्ती व अगरबत्तीची निर्मितीचे प्रात्यक्षि दाखविले. तिच्या या प्रयोगाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक मिळाला.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षक एस आर. मिरदोड्डीवार यांना दुर्धर आजार जडला आहे. मात्र त्यांनी पराजय न मानता सातत्याने विद्यार्थी घडविण्याचे काम सुरु ठेवले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात लिखितवाडा शाळेला सलग तीन वेळा ‘इन्स्पायर्ड अवार्ड’ मिळाला आहे. वैष्णवी बांगरे हिच्या प्रयोगाला राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सरळ प्रवेश मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच मान
वैष्णवी बांगरे हिच्या प्रयोगाला विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. आदिवासी प्राथमिक गटातून चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे. आता ती दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार आहे.