कोरोना काळातही प्रेमविरात ‘व्हॅलेंटाइन वीक’चा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:27 AM2021-02-10T04:27:54+5:302021-02-10T04:27:54+5:30
चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीतील ‘व्हॅलेंटाइन वीक’ आता आपल्या देशातही साजरा होऊ लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन डेच्या विविध दिनविशेषांना ...
चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीतील ‘व्हॅलेंटाइन वीक’ आता आपल्या देशातही साजरा होऊ लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन डेच्या विविध दिनविशेषांना सुरुवात होताच प्रेमवीरांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. अनेक युवा आपल्या स्वप्नातील राजकुमारीला मनातील भावना सांगण्यासाठी हा उत्सव साजरा करताना दिसून येत आहेत. मात्र, कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने व्हॅलेंटाइन आठवड्यात गजबजून राहणारे कॉलेज कट्टे विद्यार्थ्यांविना ओस दिसून येत आहेत.
फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमवीरांसाठी पर्वणीच असते. पूर्वी प्रेम हा शब्द उच्चारताच कान टवकारले जायचे. मात्र, दिवसेंदिवस आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत असल्याने प्रेमदिनाच्या संकल्पनेतही बदल होत आहे. त्यामुळे प्रेमीयुगुल मोठ्या आतुरतेने फेब्रुवारी महिन्याची वाट बघत असतात. अनेकांना या आठवड्यात जीवनभराचे साथीदारही मिळत असतात, तर अनेकांचा प्रेमभंगही होत असतो. त्यामुळे व्हॅलेंटाइन वीक हा बहुतांश तरुणांच्या कायम आठवणीत राहणारा उत्सव आहे. साधारणपणे महाविद्यालयात प्रेमाला बहर येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे महाविद्यालये सुरू झालेच नाहीत. यावर्षी व्हॅलेंटाइन डेनंतर महाविद्यालये सुरू होणार असल्याने महाविद्यालयीन युवकांना हा दिवस साजरा करण्यास अडचण जाणार आहे. दरवर्षी महाविद्यालयीन युवक व्हॅलेंटाइन डे मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचे; परंतु यंदा व्हॉटस्ॲप, फेसबुक सोशल मीडियावरच व्हॅलेंटाइन साजरा करावा लागणार आहे.
बॉक्स
व्हॅलेंटाइन हे रोमन संत
संत व्हॅलेंटाइन हे रोमन कॅथलिकपंथीय होते. या प्रेमळ संताच्या नावावर व्हॅलेंटाइन डे हा उत्सव जगभर साजरा केला जातो. मुळात प्रेम हे फक्त प्रेयसीवरच केले जात नाही. आपल्या सर्वांची हृदयस्थ व्यक्ती ही आई, वडील, भाऊ, बहीण, चिमुकली मुले किंवा पाळीव प्राणीसुद्धा होते. संशोधनानुसार प्रेम एक भावना आहे. ती भावना व्यक्तीतून प्रकट झालीच पाहिजे; परंतु आजचे युवा केवळ प्रेयसीवरच प्रेम करण्याच्या आविर्भावात हा सण साजरा करतात.