प्रकल्पग्रस्तांमुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:42 PM2017-11-04T23:42:46+5:302017-11-04T23:42:57+5:30
बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी येथील पोवनी-२ कोळसा खाणीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील २४ दिवसांपासून ठप्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी येथील पोवनी-२ कोळसा खाणीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील २४ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे वेकोलिला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, समस्या जाणून घेण्यासाठी शासन गंभीर नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी वेकोलि व शासनाच्या विरोधात १० आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वेकोलिचे काम बंद आहे. त्यामुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचे नुकसान सहन करावा लागत आहे. नुकसानीचा हा आकडा दहा कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. पोवनी २ व ३ प्रकल्पासाठी जवळपास एक हजार ९०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. पवनी २ कोळसा खाणीमध्ये ११३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पवनी ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, प्रति सातबारा नोकरी देण्यात यावी, पोवनी २ च्या प्रकल्पांना तत्काळ मोबदला, नोकरी देण्यात यावी, साखरी गावातील बेरोजगारांना पोवनी २ खाणीमध्ये रोजगार देण्यात यावा, साखरी शेतशिवारातील उर्वरित जमीन पोवनी ३ प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावी, पवनी ३ मधील प्रकल्पग्रस्तांना बल्लारपूर येथील खुल्या खाणीत नोकरी देण्यात यावी, यासह १२ मागण्यांचे निवेदन प्रकल्पग्रस्तांकडून देण्यात आले आहे.