विविध मागण्यांसाठी माना जमात बांधव रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:38 PM2018-09-16T22:38:28+5:302018-09-16T22:38:49+5:30
माना जमातीवर शासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरूद्ध सर्व माना जमातीच्या वतीने शहीदांची भूमी असलेल्या तळोधी (नाईक) येथून रविवारी चेतावनी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो समाजबांधव राजकीय पुढाऱ्याविना सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : माना जमातीवर शासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरूद्ध सर्व माना जमातीच्या वतीने शहीदांची भूमी असलेल्या तळोधी (नाईक) येथून रविवारी चेतावनी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो समाजबांधव राजकीय पुढाऱ्याविना सहभागी झाले होते.
संविधानातील ३४२ व्या कलमानुसार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये १८ व्या क्रमांकावर 'माना' जमातीची नोंद आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय माना जमातीच्या बाजूने आहेत. शिवाय राज्य शासनाचे माना जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, असे परिपत्रक असतानाही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली, नागपूर, अमरावती माना जमातीस जात वैधता प्रमाणपत्र देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत आहे. तसेच माना जमातीचे सर्व प्रकरणे अवैध ठरविण्याचा घाट वरील सर्व तपासणी समित्यांनी घातलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही माना नाही, अशा पध्दतीचा खोटा अहवाल शासनास गडचिरोली समितीने सादर केला आहे. माना जमातीवर अन्याय करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी व माना जमातीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अनेकदा केली. परंतु अद्याप कुठलेही पाऊल शासनाकडून उचलले गेलेले नाही. त्यामुळे माना जमातीतील आक्रोश मोर्चाच्या स्वरुपात रस्त्यावर दिसून आला. सदर मोर्चा चिमुरातील उपविभागीय कार्यालयावर धडकला. डॉ. भगवान नन्नावरे, देवीदास जांभुळे, कुलदीप श्रीरामे, संदीप खडसंगे, बळीराम गडमडे, रामराव नन्नावरे आदींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.