विविध कार्यकारी संस्थेची तिजोरी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:50 PM2018-05-06T23:50:58+5:302018-05-06T23:50:58+5:30
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या सावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची तिजोरी फोडून ५० हजार रुपयाची रोकड व चांदीचे पाच शिक्के असा एकूण ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या धाडसी चोरीने दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या सावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची तिजोरी फोडून ५० हजार रुपयाची रोकड व चांदीचे पाच शिक्के असा एकूण ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या धाडसी चोरीने दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
आठवडाभरापूर्वी लगतच असलेल्या शेतकरी राईस मीलच्या गोदामाचे कुलूप कटरने कापून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तेथे धानाच्या व्यतीरिक्त काहीही हाती लागले नाही. आठ दिवसानंतर शनिवारी त्याच्याच शेजारी असलेल्या विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयाचे शटर तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. येथील तिजोरी फोडून त्यातील ५३ हजाराचा ऐवज रोख रकमेसह पळवून नेला.
सदर संस्था सावली तालुक्यातील नामवंत असून गत ७५ वर्षांपासून संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत शेतकºयांना पीक कर्ज, रासायनीक खते आणि रेशनचे धान्य वाटप केले जाते.
या संस्थेतून कोट्यवधीची उलाढाल होत असते. मात्र घटनेच्या रात्री तिजोरीत केवळ ५० हजार रुपये रोख होते. अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून शेजारीच असलेल्या विहिरीत तिजोरी फेकून दिली. यासोबतच त्यांनी रेशन दुकानाचेही कुलूप फोडले. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.
या घटनेची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुन्ना स्वामी यांनी सावली पोलिसांनी दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली. त्याकरिता श्वान पथक व फॉरेसील विभागाला पाचारण करण्यात आले. पुढील तपास सावलीचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
वेकोलि कॉलनीत घरफोडी
घुग्घुस : वेकोलिच्या राजीव कॉलनीत राहणाºया निलजई साऊथमध्ये कार्यरत अभियंता रणजितसिंह भाटी यांच्या क्वार्टरचे मागचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, पेनड्राईव्ह असा एक लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अभियंता रणजितसिंह भाटी हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी परत आले असता, समोरील दार तुटलेल्या अवस्थेत आढळले. आत प्रवेश केला असता, लॅपटॉप आणि चार पेनड्राईव्ह असा एक लाखांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसले. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून चोरट्याचा शोध घेत आहेत.