वन्य प्राण्यांना हाकलून लावण्यासाठी विविध प्रयोग
By admin | Published: July 14, 2014 11:53 PM2014-07-14T23:53:09+5:302014-07-14T23:53:09+5:30
जंगलव्याप्त परिसरात मानव व वन्यप्राणी संघर्ष सातत्याने घडतात. वन्यप्राणी शेतपिकांचे मोठे नुकसान करतात. अनेकवेळा ग्रामस्थ वन्यप्राण्यांना जीवे मारतात. हा प्र्रकार थांबविण्यासाठी वन्यप्र्राण्यांना
सिंदेवाही : जंगलव्याप्त परिसरात मानव व वन्यप्राणी संघर्ष सातत्याने घडतात. वन्यप्राणी शेतपिकांचे मोठे नुकसान करतात. अनेकवेळा ग्रामस्थ वन्यप्राण्यांना जीवे मारतात. हा प्र्रकार थांबविण्यासाठी वन्यप्र्राण्यांना जंगलाच्या दिशेने कसे पळवून लावायचे याबाबत सिंदेवाही तालुक्यातील घोट येथे वनविभागाने ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन ब्रह्मपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक आर्शीवाद मेश्राम यांनी केले. याप्रसंगी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रुद्राधित्य यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करुन दाखविले.
याप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. बी. कामडी यांनी जंगली डुक्करांपासून शेतातील पाळ फोडणे व पऱ्हे उकतने तसेच अन्य कारणांमुळे शेतीचे नुकसान करतात.यावर काय उपाय योजना कराव्या यावर मार्गदर्शन केले. संचालन क्षेत्र सहायक बिपटे तर आभार वनपरिक्षेत्राधिकारी पी. एम. चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला सरपंच सिडाम, पोलीस पाटील पांडुरंग सिडाम, क्षेत्र सहाय्यक पी. डब्ल्यू. बिपटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष निकुरे, क्षेत्र सहायक, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष, वन कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना करून दाखविले प्रात्यक्षिक
जंगलातील चितळ, सांबर व डुक्कर शेतपीकांचे नुकसान करतात. तेव्हा त्यांना हाकलून लावण्यासाठी गायीचे शेण व त्यामध्ये लाल मिरची टाकून गोवरी तयार करावी. त्याला चारदिवस सुकविण्यात यावे. नंतर शेताच्या सभोवताल सायंकाळला शेतातील पूर्ण काम झाल्यानंतर जाळावे. ती गोवरी तीन ते चार तासपर्यंत जळत राहील. मिरचीच्या येणाऱ्या उग्र वासाने जंगली प्राणी पळून जातील. यावर प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे बाबूंच्या काठीला बारदाना (पोते) गुंडाळून त्यामध्ये मिरच्या टाकून टेंभा तयार करावा. त्याला पूर्णत: जाळावे. परत पोत्याच्या सहाय्याने विझविवावे. दहा टक्के टेंभा जळत राहिल्याची खात्री करावी व ते बांबूला बांधून धुऱ्याच्या चारही बाजूला ज्या दिशेने वन्यप्राणी शेताकडे येतात अशा बाजूला ठेवावे. त्या जळत असलेल्या टेंभ्याच्या उग्र वासाने वन्य प्राणी पळून जात असल्याची माहिती डॉ. रुद्राधित्य यांनी दिली. दोन्ही प्रयोगानंतर वन्यप्राणी नुकसान करीत असल्यास तिसरा उपाय म्हणून सर्व बारदान्याला (पोत्याला) जळालेले तेल ब्रशने लावण्यात यावे व त्याच्यावर तिखटाची भुकटी टाकावी व सभोवताल नायलानची दोरी लावून त्याच्यावर पोते ताराने बांधावे व ज्या दिशेने वन्यप्राणी शेतात येतात त्या दिशेने तीन ते चार फूट अंतरावर ते बांधावे. पावसाने ओले होवू नये म्हणून त्याच्यावर प्लास्टिक ठेवावे. तिखटावर आलेल्या तेलाच्या उग्र वासाने जवळपास ४८ तासपर्यंत कुठलेही वन्यप्राणी त्या दिशेला येणार नाही. याबाबत ग्रामस्थांना कमी खर्चात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले.या उपाययोजना केल्यास भविष्यात वन्यप्राणी शेतातील नुकसान टाळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.