वसंतराव नाईकांनी कृषिक्रांती केली
By admin | Published: July 3, 2016 12:50 AM2016-07-03T00:50:15+5:302016-07-03T00:50:15+5:30
स्व. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता विशेष प्रयत्न केले.
रामभाऊ टोंगे : बल्लापूर येथे कृषीदिन साजरा
बल्लारपूर : स्व. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कृषिक्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी केले.
बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत पंचायत कृषी विभाग व तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थानिक सभागृहात महाराष्ट्रातचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जयंती दिनानिमित्त कृषिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी टोंगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, माजी सभापती अॅड. हरीश गेडाम, गटविकास अधिकारी भुजंगराव गजभे, कृषी विस्तार अधिकारी अमोल उघडे, सुधाकर खांडरे आदींची उपस्थिती होती.उपसभापती मेश्राम म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न बाळगले होते. त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाया घातला. त्यामुळे शेती उत्पादनात महाराष्ट्राला बळकटी आली. आता मात्र कृषी क्षेत्रावर अवकळा आल्याचे चित्र आहे, अशी त्यांनी टीका केली.
संचालन कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी आणि आभार प्रदर्शन तालुका कृषी विस्तार अधिकारी एस. धनंजय यांनी केले.
कार्यक्रमाला किन्ही येथील सरपंच जीवनकला आत्राम, उपसरपंच वासुदेव येरगुडे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)