वेकोलिच्या प्रदूषणमुळे माजरीकरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:32+5:302021-07-14T04:33:32+5:30
वेकोलिच्या खुल्या खाणी व कोळसा साइडिंगमुळे वायुप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. वायुप्रदूषणमुळे माजरी परिसरात ...
वेकोलिच्या खुल्या खाणी व कोळसा साइडिंगमुळे वायुप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. वायुप्रदूषणमुळे माजरी परिसरात बहुतांश नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे आजार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार, तसेच अन्य विकाराने ग्रस्त दिसून येत आहेत. या सर्व समस्या लक्षात घेता, माजरी क्षेत्रातील नागरिकांनी पालकमंत्री, वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, याकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. १२ डिसेंबर, २०१९ला नागलोन यूजी टू ओसी या खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणासाठी कुचना येथे जनसुनावनी ठेवली असता, अनेकांनी माजरीच्या विविध कोळसाखाणीमुळे माजरी परिसरात प्रदूषण होत आहे. खाणीतून निघनारे रासायनिक पाणी माजरीची जीवनदायिनी वर्धा नदीत सोडण्यात येत आहे. ते पाणी वेकोलिचद्वारे पाइपलाइनच्या माध्यमातून माजरीतील जनतेला पिण्याकरिता पुरवठा केला जातो, असे कुचना येथे जनसुनावनीच्या दरम्यान नागरिकांनी संबंधितांना सांगितले. मात्र, वेकोली प्रशासनाने दुर्लक्ष केले. जनसुनावणीच्या दिवशी पर्यावरण विभागाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांसमोर वेकोलि अधिकाऱ्यांची तक्रार केली, परंतु आजपर्यंत तोडगा निघाला नाही. सध्या वेकोलिच्या एनएमओसी युजीटू नागलोन खुल्या खाणीत कोळसाच्या ढिगाऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. त्यांच्या विषारी धुरामुळेही माजरीत प्रदूषण वाढले आहे. वेकोलिच्या ट्रान्सपोर्टिंगमुळे रस्त्यावर धूळ उड़त असल्यामुळे मोठे प्रदूषण होत आहे. यावर त्वरित आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.