चंद्रपुरात भाजीपाला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:22 PM2018-06-06T23:22:50+5:302018-06-06T23:23:04+5:30

Vegetable free at Chandrapur | चंद्रपुरात भाजीपाला मोफत

चंद्रपुरात भाजीपाला मोफत

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन : सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध करण्याच्या अनुषंगाने बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी गांधी चौकात आंदोलन करीत घाम गाळून पिकविलेला भाजीपाला मोफत वाटून दिला.
यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव देण्याचे आश्वासन दिले. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. यामुळेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून ऐन खरिपाच्या हंगामात आंदोलन करावे लागत आहे. शेतकरी आजघडीला डबघाईस आला आहे. त्याच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी प्रधान देशात विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र करून ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंंबा म्हणून आंदोलनात सहभाग घेतला आहे, त्याचप्रमाणे १ ते १० जूनदरम्यान सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना लालीपाप दाखवत उत्पादित मालाच्या लागत मुल्यापेक्षा ५० टक्के आधारमूल्य देण्याची घोषणा केली. मात्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळत नाही. बि-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचा लागणारा खर्च निघत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला. याचे पडसाद देशभर उमटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी व त्यांच्या न्याय मागण्या त्वरित सोडविल्या जाव्या म्हणून जिल्ह्यातील शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर न टाकता गरजू लोकांना मोफत वाटला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज वाटप झाले पाहिजे व मोफत बि- बियाण्यांचा पुरवठा करावा, अशी घोषणाबाजी करून सरकारकडे न्याय मागितला. या आंदोलनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस, एनएसयुआय, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यासह कॉंग्रेसचे राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते तथा विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकूलकर, नगरसेवक अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.
अनेक गावातील शेतकरी सहभागी
सदर आंदोलन शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या मागणीसाठी असल्याने मार्डा, विसापूर, शिवणी, पिपरी, दाताळा, वेंडली यासह चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ सहभागच दर्शविला नाही तर त्यांनी बैलबंडीतून आपल्या शेतातील भाजीपालाही वाटण्यासाठी आणला.

Web Title: Vegetable free at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.