गडचांदुरातील हातठेले घेऊन भाजीपाला विक्रेते नगर परिषदेवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:52+5:302021-06-22T04:19:52+5:30
कोरपना : सकाळच्यावेळी गडचांदूर येथील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना शुक्रवारपासून कोणतीही सूचना न देता नगरपरिषदेच्यावतीने हटविण्यात येत ...
कोरपना : सकाळच्यावेळी गडचांदूर येथील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना शुक्रवारपासून कोणतीही सूचना न देता नगरपरिषदेच्यावतीने हटविण्यात येत असल्यामुळे संतप्त भाजीविक्रेत्यांनी चक्क नगरपरिषदेवर हातठेले नेऊन निषेध नोंदविला. मुख्याधिकारी विशाखा शेळके या मनमानी करत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून येथील मुख्य चौकात भाजीविक्रेते भाजीपाला विक्रीसाठी बसतात. याठिकाणी ग्राहकांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असल्यामुळे विक्री चांगली होते. मात्र नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता शुक्रवारपासून या भाजी विक्रेत्यांना हटविणे सुरू केले. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे कारण पुढे करून आम्ही पोट कसे भरायचे, हा प्रश्न भाजी विक्रेत्यांनी निर्माण केला. यासंदर्भात मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
कोरोनाच्या प्रकोपात भरचौकात सुरू होती दुकाने
कोरोनाचा प्रकोप सुरू असताना शिवाजी चौकात दुकाने सुरू होती. तेव्हा कोणालाच अडचण होत नव्हती. मात्र कोरोनाचा प्रकोप ओसरल्यावर भाजीपाला विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी अचानक दुकाने हटविण्याची नगरपरिषदेला घाई का झाली? हे समजणे कठीण आहे.
तात्काळ हटविण्याची आवश्यकता नव्हती - नगराध्यक्ष
मंगळवारी चिठ्ठ्या टाकून महात्मा फुले व्यापारी संकुलाच्या मागच्या जागेवर भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र चिठ्ठ्या टाकायच्या अगोदरच भाजीपाला विक्रेत्यांना हटविणे आवश्यक नव्हते. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटविले. याबाबत आपल्याला माहिती नसून, त्यांना मुख्याधिकाऱ्यांचा आदेश होऊ शकतो, असे गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सविता टेकाम यांनी म्हटले.
मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही
कोणतेही निर्णय घेत असताना पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे गडचांदूर नगरपरिषदेमध्ये दिसून येते. मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्या मनमानी कारभाराला नगर परिषदमधील अनेक नगरसेवक व पदाधिकारी कंटाळले आहेत.