पेट्रोल पंपांवर वाहनांची झुंबड
By Admin | Published: August 25, 2014 11:53 PM2014-08-25T23:53:48+5:302014-08-25T23:53:48+5:30
स्थानिक संस्था कर व मुंबईच्या आॅक्ट्रायविरोधात पेट्रोलपंप असोसिएशनने आंदोलन छेडले. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंदचा इशारा दिला.
चंद्रपूर : स्थानिक संस्था कर व मुंबईच्या आॅक्ट्रायविरोधात पेट्रोलपंप असोसिएशनने आंदोलन छेडले. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंदचा इशारा दिला. त्यामुळे आज सोमवारी चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर वाहनांची झुंबड उडाली होती. सकाळी ११ पासून रात्री उशिरापर्यंत पंपांवर वाहनांची गर्दी कायम होती.
सध्या पेट्रोल, डिझेल या एकप्रकारे जीवनावश्यक वस्तूच झाल्या आहेत. मात्र शासनाने पेट्रोलवर महापालिका हद्दील एलबीटी लावून चैनीच्या वस्तूंप्रमाणे कर आकारला आहे. ही बाब अन्यायकारक आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेत आॅक्ट्राय लागू आहे. या आॅक्ट्रायचा फटका राज्यातील इतर जिल्ह्यांना बसत आहे. परिणामी पेट्रोल असोसिएशनने याचा कडाडून विरोध केला आहे. मुंबईचा आक्ट्राय आम्ही का भरावा व पेट्रोलवर चैनीच्या वस्तूंसारखा एलबीटी लावू नये, या मागणीसाठी पेट्रोलपंप असोसिएशनने ११ आॅगस्ट रोजी पेट्रोलपंप बंद ठेवत आंदोलन छेडले होते. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यामुळे उद्या मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंद राहील, असा निर्णय पेट्रोल असोसिएशनने घेतला. जिल्ह्यात एकूण ९९ पेट्रोलपंप आहेत. यात इंडियन आॅईलचे ३७, भारत पेट्रोलियमचे ३५ व हिंदुस्थान पेट्रोलियमचे २७ पंप आहेत. यातून दररोज चार कोटींची उलाढाल होते. उद्यापासून बंद राहणार या भीतीने सोमवारी जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपवर वाहनांची झुंबड उडाली होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पंपावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दररोज होणारी चार कोटींची उलाढाल आज आठ कोटीपर्यंत गेल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी ५ ते १० लिटरपर्यंत पेट्रोलचा साठा केला. (शहर प्रतिनिधी)