वाहनमालकांनो कर भरा अन्यथा होणार कारवाई, थकबाकीधारकांना आरटीओचा इशारा
By परिमल डोहणे | Published: February 28, 2024 06:08 PM2024-02-28T18:08:02+5:302024-02-28T18:08:13+5:30
मार्च महिन्याच्या आत सर्वांनाच विविध कराचा भरणा करावा लागतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनमालकांलासुद्धा दरवर्षीच वाहन कर भरावा लागतो.
चंद्रपूर : व्यावसायिक वाहनावरील थकीत कर वसूल करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कठोर पाऊले उचलली असून करवसुलीसाठी जिल्हाभरात पाच पथके गठित केली आहेत. ही पथके कर न भरणाऱ्याचे वाहन जप्त करून कारवाई करणार आहेत. त्यामुळे कर थकविणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.
मार्च महिन्याच्या आत सर्वांनाच विविध कराचा भरणा करावा लागतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनमालकांलासुद्धा दरवर्षीच वाहन कर भरावा लागतो. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. नोटीस पाठवल्या जातात. तरीसुद्धा अनेक वाहनमालक व्यावसायिक कर भरण्याकडे कानाडोळा करतात. मात्र, आता मार्च महिना दोन दिवसांवर आला आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी थकबाकीदार वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली असून करवसुली करण्याची जिल्हाभरात पाच पथके गठित केली आहेत. ही पाचही पथके थकबाकीदार वाहनमालकांचे वाहन जप्त करून कारवाई करणार आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी वाहनमालकांनी थकीत कर भरावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी वाहन कर थकबाकीदार वाहनमालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली असून जिल्हाभरात पाच पथके गठित केली आहेत. ही पथके थकीत कर भरणाऱ्यांचे वाहन जप्त करून न्यायालयीन कारवाई करणार आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी थकीत वाहनकर त्वरित भरावा.
-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर