पोलीस ठाण्यातील वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत
By Admin | Published: June 25, 2014 11:40 PM2014-06-25T23:40:27+5:302014-06-25T23:40:27+5:30
विविध प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेली वाहने येथील शहर पोलीस तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातच पडून आहेत. अनेक वर्षांपासून पडून असलेली ही वाहने ऊन्ह, पावसाच्या तडाख्यात भंगार होत आहेत.
भंगारातील वाहनांचा वाली कोण : अनेक वाहनांतील साहित्य लंपास
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
विविध प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेली वाहने येथील शहर पोलीस तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातच पडून आहेत. अनेक वर्षांपासून पडून असलेली ही वाहने ऊन्ह, पावसाच्या तडाख्यात भंगार होत आहेत. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून या वाहनांचा लिलाव झाला नाही. विशेष म्हणजे, अनेक वाहनांचे सुटे भाग पोलीस ठाण्यातून चोरीला गेल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यामध्ये जमा केले जाते. त्याचबरोबर अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन, चोरी, जुगारावर छापा टाकून जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच ठेवली जातात. ही वाहने सोडविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र, बऱ्याच वाहनांची कागदपत्रेच राहत नाहीत. त्यामुळे ही वाहने पोलीस ठाण्यामधून परत जाऊ शकत नाहीत. न्यायालयीन खटला चालू असलेली वाहने खटल्याचा निकाल लागल्याशिवाय नेता येत नाहीत. वर्षानुवर्षे खटल्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यामध्येच पडून राहतात. पोलीस ठाण्यामध्ये या वाहनांना ठेवण्यासाठी कोणतीही सुरक्षीत जागा नसते. या वाहनांकडे विशेषत: कोणीही लक्ष देत नाही.
न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ही वाहने परत नेता येऊ शकतात. मात्र, तोपर्यंत वाहन भंगारामध्ये विकण्याच्याच लायकीचे झाली असल्याने बरेच वाहनधारक वाहन नेण्यास तयार होत नाहीत. दहा वर्षांनंतर ही वाहने ओळखणेही कठीण होऊन जाते. पोलीस ठाण्यात सायकल, दुचाकी, चारचाकी वाहने, कार यासारखी हजारो वाहने भंगार झाली आहेत.
एवढी मोठी वाहने व्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जागा नाही. त्यामुळे ही वाहने उघडयावरच बेवारस स्थितीत पडली आहेत. ठाण्यातील शेकडो सायकली पूर्णपणे गंजल्या आहेत. काही सायकलीचे भाग कायमचे नष्ट झाले असल्याचे दिसून येते. असे असतानाही पोलीस विभागाकडून याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. (नगर प्रतिनिधी)