वेकोलिने थकविला नगरपरिषदेचा ४४ लाखांचा गृहकर; अनेकदा नोटीसा बजावल्या
By राजेश मडावी | Published: January 10, 2024 03:47 PM2024-01-10T15:47:30+5:302024-01-10T15:49:14+5:30
वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस कार्यालयाकडे नगर परिषदेचा ४४ लाख २६ हजार ३५२ रूपयांचा गृहकर दोन वर्षांपासून थकीत आहे.
चंद्रपूर : वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस कार्यालयाकडे नगर परिषदेचा ४४ लाख २६ हजार ३५२ रूपयांचा गृहकर दोन वर्षांपासून थकीत आहे. थकीत कर भरण्यासाठी अनेकदा नगर परिषदने नोटीसा बजावल्या. मात्र वेकोलि प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने उपक्षेत्रीय कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
घुग्घुस परिसरात वेकोलिचे उपक्षेत्रात विविध कामगार वसाहती व कार्यालये आहेत. त्यांच्याकडे नगर परिषदचा २०२२-२०२३ तसेच २०२३-२०२४ या दोन आर्थिक वर्षांचा ४४ लाख २६ हजार ३५२ रुपयांचा गृह कराची रक्कम थकीत आहे. या थकीत गृहकर भरण्यासाठी नगर परिषदने वारंवार नोटीस देऊनही वेकोलि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नगर परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे.
थकीत रक्कम न मिळाल्याने गावातील विकासाचे कामे रखडली. याबाबत मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार यांना विचारले असता म्हणाले, दोन वर्षांपासून गृहकराची रक्कम थकीत आहे. त्यामुळे वेकोलिकडून वसुली करण्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील कार्यवाही कारवाई करण्यात येईल.