पुनर्वसित कुनाडा गावाचा पाणीपुरवठा वेकोलि बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:18+5:302021-02-15T04:25:18+5:30
विनायक येसेकर भद्रावती : वेकोलिमार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलि आता १५ फेब्रवारीपासून पंपावरील विद्युत पुरवठा ...
विनायक येसेकर
भद्रावती : वेकोलिमार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलि आता १५ फेब्रवारीपासून पंपावरील विद्युत पुरवठा खंडित करून पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे पत्र नुकतेच ग्रामपंचायत सचिवांना देण्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे
माजरी एरियातील कुनाडा गावाचे २००६ मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते; परंतु या गावात अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्वसन समिती नेमण्यात आली. त्यानंतर या गावाची संपूर्ण जबाबदारी वेकोलिने घेऊन गावाला दत्तक घेण्यात आले. त्यानंतर २०१० साली कुनाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. दहा वर्षांपर्यंत वेकोलिमार्फत गावामध्ये सोयी-सुविधा व्यवस्थित चालू असताना आता वेकोलिच्या महाप्रबंधकाने ग्रामपंचायत सचिवाला पत्र देऊन या गावाला करण्यात येणारा पाणीपुरवठा वीज खंडित करून बंद करण्यात येणार असल्याचे सुचविण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बॉक्स
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे महाप्रबंधकाला निवेदन
येथील ग्रामपंचायत सचिव यांना पत्र मिळताच समस्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव तयार करून वेकोलिने दत्तक घेतलेल्या गावाचा पाणीपुरवठा तसेच विद्युत भरणा वेकोलिमार्फतच करण्यात यावा. ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही आर्थिक स्रोत नसल्याने ती भार उचलण्यास सक्षम नाही. वेकोलिने दत्तक घेतलेल्या गावाचा आपण वीज खंडित करून पाणी पुरवठा का बंद करत आहे. याबाबतची आपण माहिती द्यावी, याकरिता तंटामुक्त समितीने महाप्रबंधकाला निवेदन दिले आहे.
बॉक्स
नगर परिषद हद्दीत असलेल्या गावाचा कारभार ग्रामपंचायत सचिवाकडे.
भद्रावती शहरापासून अवघ्या एक किमी अंतरावर कुनाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. माजरी एरियातील वेकोलिची एकता नगर वसाहत नगरपालिका क्षेत्रात येत असल्याने पुनर्वसित कुनाडा या गावात ग्रामपंचायत आहे. या गावातील एक घर नगरपालिकेचा टॅक्स भरत आहे. या गावातील संपूर्ण घरावर वेकोलिचा अधिकार आहे. नगर परिषदेने केलेल्या सूचना गावकऱ्यांनी मान्य केल्यास नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यास या गावाचा विकास करणे शक्य होणार आहे. पंचवार्षिकमध्ये या गावातील निवडणूकसुद्धा झाली नसून या गावाचा संपूर्ण कारभार ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती चालवत आहे.
बॉक्स
शौचालयाचा प्रस्ताव रद्द
या गावातील बहुतांश घरांमध्ये शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास बसत असतात. त्यामुळे हे गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वत: नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी पुढाकार घेऊन गावाची पाहणी करून या गावात शौचालय उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, या गावकऱ्यांना तो मान्य नसल्याने येथील शौचालयाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.