वर्षानुवर्षांपासून वास्तव्य असताना वेकोलिचा त्रास खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 11:36 PM2022-10-18T23:36:54+5:302022-10-18T23:42:51+5:30
पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वेकोलीने यापुढे कोणतीही नोटीस द्यायची नाही. ज्यावेळी अतिक्रमण झाले, त्याच वेळेस वेकोलीने आक्षेप का घेतला नाही. आज त्यांची दुसरी-तिसरी पिढी राहत असताना नागरिकांना जमिनी खाली करायला लावता. हे अतिशय गंभीर आहे. अतिक्रमित जमिनी पुन्हा डी-नोटिफाईड करणे आणि गुगल मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबवावी. नागरिकांनी जमिनीचा पट्टा मागण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ, हिंदुस्थान लालपेठ कॉलनी आणि इतर भागांत ४० ते ५० वर्षांपासून लोकांचे वास्तव्य आहे. या क्षेत्रात नागरी सुविधांचीही कामे झाली. ही कामे होत असताना वेकोलिला जाग आली नाही. मात्र, आता तेथील रहिवाशांना नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्यांना वेकोलिने त्रास देऊ नये, या शब्दांत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांना फटकारले. वेकोलिने नागरिकांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावल्याने सोमवारी
जिल्हा नियोजन सभागृहातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) देवराव भोंगळे, शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, जि. प. माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, विवेक बोडे उपस्थित होते.
पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वेकोलीने यापुढे कोणतीही नोटीस द्यायची नाही. ज्यावेळी अतिक्रमण झाले, त्याच वेळेस वेकोलीने आक्षेप का घेतला नाही. आज त्यांची दुसरी-तिसरी पिढी राहत असताना नागरिकांना जमिनी खाली करायला लावता. हे अतिशय गंभीर आहे. अतिक्रमित जमिनी पुन्हा डी-नोटिफाईड करणे आणि गुगल मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबवावी. नागरिकांनी जमिनीचा पट्टा मागण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर करावा, अमृतमहोत्सवी वर्षात जनतेच्या जमिनी जनतेला द्यावे नवीन अतिक्रमण होत असेल तर त्यांना रोखावे. याबाबत जिल्हा प्रशासन वेकोलिला सहकार्य करेल.
मात्र अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्यांचे छत्र हिरावून घेऊ नका, अशा शब्दांत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वेकोली अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी बाबूपेठ, लालपेठ व इतर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन चंद्रपूर आराखड्याबाबत सूचना
- गट क्रमांक ३२९ एसीसी कंपनीला विनापरवानगी कसा दिला, याचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासावी व नवीन चंद्रपूर आराखड्याबाबत बैठक घ्यावी. ओबीबाबतीत रॉयल्टी शून्य करता येईल का, याचे नियोजन करावे. तहसीलदार व वेकोलीने ब्लास्टिंगचा एक प्रस्ताव तयार करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घ्यावी वस्तुस्थिती
निवृत्त झालेले कर्मचारी हक्काचा पैसा मिळाल्यावर घर खाली करतील. ज्या जमिनीवर अतिक्रमण आहे. त्याच्या मोजणीची प्रक्रिया सुरू करावी. खाणीच्या सुरक्षेसाठी खाण सुरक्षा अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून वस्तुस्थितीबाबत अवगत करावे. मायनिंग सेफ्टी अधिकाऱ्यांसोबत व्हीएनआयटीद्वारे सर्व्हे करावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बैठकीत केल्या.